अहमदनगर - पोलिस दलातील जिगरबाज पोलिस कॉन्स्टेबल याकुब सय्यद यांना नुकताच 'सर्वोत्कृष्ट अपराधसिध्दी' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी सय्यद यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले.
याकुब सय्यद यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस असताना सण २०१८ मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात सर्वोत्कृष्ट तपास केला. त्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या गुन्ह्याची महाराष्ट्र राज्यात जानेवारी २०२१ महिन्यासाठीच्या 'सर्वोत्कृष्ट अपराधसिध्दी' या पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे. या प्रशंसनीय कामगिरी करिता त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
याकुब सय्यद यांनी भविष्यात असेच उत्कृष्टपणे कर्तव्य बजावून महाराष्ट्र पोलिस दलाच्या परंपरेत भर टाकावी, अशी अपेक्षा पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी व्यक्त केली आहे.
पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी महाराष्ट्र पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवले आहे, त्यामध्ये सध्या कोतवाली पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले याकुब सय्यद यांचाही समावेश आहे.