नाशिक : महानगर पालिकेचे सिडको प्रशासन दखल घेत नसल्याने शेवटी आपल्या न्याय हक्कासाठी 'झुकेंगे नही साला' असा आक्रमक पवित्रा घेत पाथर्डी फाटा येथील गामने ग्राउंड शेजारील भाजीविक्रेत्यांनी एकीची वज्रमूठ आवळत अनोखे आंदोलन केले. या आंदोलनाचे लाईव्ह रिपोर्टिंग 'MBP LIVE 24' ने केले.
मात्र, काही दिवसांपूर्वी येथून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मारुती स्वीट चौकात अचानकपणे बाहेरून येऊन काही लोक भाजीविक्रीचा व्यवसाय करू लागले आहेत. त्यामुळे गामने ग्राऊंडच्या बाजूला महापालिकेने लायसन्स देऊन बसवलेल्या भाजीविक्रेत्यांना आर्थिक फटका बसत असल्याने अन्याय होत आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडे लेखी तक्रारी देऊनही कारवाई होत नसल्याने लायसन्सधारक भाजीविक्रेत्यांनी आरपारची लढाई करण्याचे ठरविले. थेट मारुती चौकात जाऊन संबंधित बेकायदेशीपणे बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांच्या जागेवर बसून काल, शुक्रवारी सायंकाळी भाजीविक्री केली.
आता, रोज हेच करणार तसेच आता रास्तारोको आंदोलन करणार आहेत. त्यामुळे आता याठिकाणी मोठा पेच निर्माण झाला आहे. या संघर्षातून भविष्यात येथे मोठा अनर्थ निर्माण होऊ शकतो. मात्र, सर्व परिस्थिती माहीत असतानाही डोळे झाकून बसलेले महानगरपालिकेच्या सिडको विभागातील अतिक्रमण विरोधी पथक त्यास जबाबदार असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
आम्ही बेकायदेशीर, तरी बसतो ! - मारुती स्वीट चौकात रस्त्याच्या बाजूला बसून भाजी विक्री करण्यासाठी तेथील भाजी विक्रेत्यांनी महापालिकेकडून कुठलीही परवानगी घेतलेली नाही. या बाबत 'MBP LIVE 24'शी बोलताना त्यांनी स्वतःच सांगितले, की आमच्याकडे महापालिकेचे लायसन नाही. तरीही आम्ही येथे बसतो.
लेखी तक्रार देऊनही कारवाई नाहीच, गौडबंगाल काय? - या सर्व प्रकाराबाबतची लेखी तक्रार गामने ग्राउंड येथील परवानाधारक भाजीविक्रेत्यांनी महापालिकेच्या सिडको विभागात जाऊन अनेकदा केलीय. मात्र, कुठलीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. यामागचे गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित होतोय.
वाहतुकीला अडथळा, अपघातांना निमंत्रण - मारुती स्वीट चौकात थेट रहदारीच्या मुख्य रस्त्याला खेटूनच बेकायदेशीर भाजीविक्रेते बसत असल्यामुळे येथे सायंकाळी मोठा अडथळा निर्माण होऊन वाहतूक ठप्प होते. यामुळे वाहनचालकांमध्ये वाद होतात. तसेच छोटे मोठे अपघात होणे हे नित्याचे झाले आहे. पादचाऱ्यांना चालणे मुश्किल झाले आहे. रोजच्याच कोंडीमुळे महिला, अबालवृद्धांचा जीव मेटाकुटीस आला आहे. भविष्यात एखाद्या अपघातात पादचाऱ्याचा जीव जाऊ शकतो. मग यानंतर प्रशासनाला जाग येईल का?
मग, अतिक्रमण विरोधी विभाग गप्प का? - पाथर्डीफाट्या वरील गामनेग्राऊंड जवळील मारुतीस्वीट चौकात कायद्याला धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे भाजीविक्री करणाऱ्यांना महापालिकेच्या सिडको विभागातील अतिक्रमण विरोधी पथक पाठबळ देत असल्याचा आरोप लायसन्सधारक भाजीविक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. कारवाईसाठी पथक दुरूनच आवाज करत येते. तेव्हढ्यापुरते तेथील भाजीविक्रेते बाजूला थांबतात. पथक जायला निघताच पुन्हा बसतात. त्यामुळे बेकायदेशीर भाजीविक्रेत्यांवर हे पथक थेट कारवाई का करत नाही, असा सवालही उपस्थित केला जातोय. याशिवाय या पथकावर कोणाचा दबाव तर नाही ना, अशी शंका देखील उपस्थित केली जातेय.
आता तीव्र आंदोलन छेडणार - बेकायदेशीर भाजीविक्रेत्यांना तेथून हलवून त्यांच्यावर कारवाई न केल्यास आता यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची दखल महानगरपालिका प्रशासनाने घ्यावी.
आम्ही महापालिकेचे परवानाधारक भाजीविक्रेते असतानाही आमच्यावर अन्याय होत आहे. त्याची दखल पालिका प्रशासन घेत नाही. आमचे रोज 2 ते 5 हजार रुपयांचे नुकसान होत आहे. न्यायहक्कांसाठी आम्ही आंदोलन केले. पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन करू.
- लक्ष्मीबाई बोऱ्हाडे, भाजीविक्रेत्या
गेल्या काही दिवसांपासून मारुती स्वीट चौकात बेकायदेशीरपणे भाजी विक्रेते बसत आहेत. त्यामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला असून मोठे आर्थिक नुकसान होत आहे. बँकेचे हप्ते थकले आहेत. आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ महानगरपालिका प्रशासनाने आणून ठेवलीय. त्यामुळे बेकायदेशीर भाजीविक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई होणे आवश्यक आहे. - सागर पवार, भाजी विक्रेता
आधीच माझी परिस्थिती खूप हालाकीची आहे. नवऱ्यावर डायलिसीस चे उपचार सुरू आहेत. त्यासाठी खूप खर्च येतोय. अशापरिस्थितीत भाजीविक्री चा व्यवसाय होत नसल्याने रोज भाजीपाला फेकून द्यावा लागत आहे. परिणामी मोठे नुकसान होत आहे. - सुनीता आहेर, भाजीविक्रेत्या
भाजीविक्री व्यवसायातूनच माझे घर चालते. मात्र, आमच्या जवळच बेकायदेशीरपणे बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांमुळे धंदा ठप्प झालाय. त्यांच्यावर महापालिका कारवाई करत नाही, याचे आश्चर्य वाटते. -निवृत्ती आहेर, भाजीविक्रेता