आम्ही लहानपणी एसटी कॉलनीमधे राहायचो. वडील 'एसटी'मध्ये नोकरीला होते. कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी असलेलं हे छान निवासी संकुल. कॉलनीच्या समोर विस्तीर्ण मैदान, परिसराला कंपौउंड असे...
ती कॉलनी म्हणजे त्या भागातील एक चांगली सोसायटी होती. सगळी गुण्यागोविंदाने रहात. एकोपा होता, प्रेम होत. एकमेकांच्या सुखा दुःखात सहभागी होणारी नाती होती. ओलावा असायचा. शालीनता होती.
छान बालपण होतं आमचं. सगळी मुले क्रिकेट, झाडावरील सुर पारंब्या, गोट्या, भोवरे, विट्टी दांडू असे सारे खेळ खेळण्यात रमायचो. सगळे श्रमजीवी माणसे. पण माणुसकीने सगळी श्रीमंत होती.
खेळता खेळता भूक लागली वा तहान लागली की सर्वांची घरे आमच्यासाठी हककाची असायची. हल्ली असं जीवन आता दिसत नाही. कॉलनी सोडून आता कितीतरी वर्षे झाली. तरीही ते खुणावणारं बालपण आठवलं की पुन्हा पुन्हा यावं वाटतं कॉलनीत.
आमची कॉलनी.. जिथे प्रत्येक घराला आपलेपणा होता. कॉलनीतील मित्राच्या घरी गेलो तर त्याच्यासोबत आम्हा मित्रांना ही काकू खायला देणारं..! मला चांगल आठवतं, माझे बाबा कधी ड्युटीवरून आले. अन् जेवायला बसले तर कधी कधी बाबा आईला सहज सांगायचे शेजारी विचार काय केलंय..
कोणाकडे पाहुणे आले अन् घरात एखादी गोष्ट नसेल तर शेजारी गरज पुर्ण व्हायची. तिथे ओलेपणा होता. जिव्हाळ्याची भावना होती. मला चांगलं आठवतं, कोणाकडे एखादी स्पेशल भाजी झाली असेल तर वाटीभर भाजी आमच्या घरी काकू घेऊन यायच्या.
तसं आमच्या घरातुन ही व्हायचं. रीतच होती ती. आमच्या बालमनावर हा संस्कार उमटला होता. शेजार म्हणजे ओलाव्याची जागा असायची. घरपण होत तिथं. हे सारं आठवलं की ते बालपणातील क्षण लुप्त झालेत की काय.? असं काहीसं वाटून गेलं..
बालपणातील आमचं रंगलेलं आतुकली भातुकलीच जीवन आता पहायला मिळत नाही. कॉलनीतील सुंदर जीवन आमच्यासाठी आत्म संस्कार होता. कॉलनी म्हणजे आमचं कुटुंब होतं.
आता जग वेगवान आहे. प्रत्येकाला काहीतरी मिळवायचं आहे. ज्याला त्याला पुढे जायचं आहे. संघर्षाला तोंड देत त्यातून त्याला निघायचं आहे. त्याला जिंकायचं आहे. तो हुशार आहे. सुख मिळण्यासाठी तो सुसाट सुटलाय..
पण त्याला लक्षात येत नाहीये की, ज्या सुखासाठी तो हे सारं करतोय, सुखाच्या बाटलीतील हे अत्तर केव्हाच गायब झालंय.. हल्ली कोणी आपली खिडकी उघडुन बाहेर पहायला सुद्धा तयार नाही. जो तो स्वतःसाठी धडपडतो आहे. त्याच्या कुटुंबासाठी धावतो आहे.
आमची कॉलनी, आमची चाळ, आमचे शेजारी असं मायेनं, जिव्हाळ्याने म्हणायचे दिवस आता गेले. मोठ्या शहरांमध्ये अपार्टमेंटच्या संस्कृतीत कोण नवीन रहायला आलं याची नोंद ठेवण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. तर शेजारधर्म लांबच राहिला..
एकमेकांच्या सुखा दुःखात सहभागी होण्याचे दिवस गेले. आता केवळ चर्चा उरलीय. अचानक घरी पाहुणे आल्यावर गरजेच्या वेळी कोथिंबीर मागायला अपार्टमेंट मधील शेजाऱ्याकडे जाण्याचे दिवस केव्हांच संपले.
ती संस्कृती लुप्त झाली. सगळ्यांनी मिळून एकत्र पंगत करण्याचा आनंद देखील आता फार पहायला मिळत नाही.. दोन कांदे, कोथींबीर मागायला कोणाकडे गेलो तर देण्यापेक्षा नाही ती कुजबुज सुरु होईल.
ही दुनिया आहे. असो, जग जवळ आलं. पण माणसे एकमेकांपासून लांब गेलीत. आधुनिक विचारांच्या जमान्यात पितळेची भांडी आता किचनमधे दिसत नाहीत.
पण खर सांगू, फाईव्ह स्टार संस्कृतीत पितळाच्या ताटात जेवणं वाढायची फॅशन आता येऊ लागलीय. दारासमोर पडलेल्या मोगऱ्याच्या फुलांचा सडा हवाहवासा वाटू लागलाय..
- जयंत येलुलकर (रसिक ग्रुप, अहमदनगर)