हिरोजी इंदलकरांनी रचलेली 'पायरी महाराष्ट्र निष्ठेची'

छत्रपतींच्या नावाच्या उलट केले तरी जिवाशी कितींदा खेळलेत छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट स्वराज्याच्या हिताची होती. सिध्दीचे सतत होणारे हल्ले, लेकीबाळींना होणारा त्रास.. याला उत्तर म्हणून महाराजांच्या दूरदृष्टीने मराठा आरमाराची निर्मिती झाली.


भुईकोट आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी शत्रूंना पळवून लावण्यासाठी छत्रपतींनी सागरी किल्ल्यांची निर्मिती केली. छत्रपतींनी 1664 ला या 48 एकराच्या बेटांवर हा सिंधुदुर्ग बांधण्याची योजना आखली. अर्थातच ही जबाबादारी स्वराज्याचे स्थापत्य अभियंते आदरणीय हिरोजी इंदूलकरांना सोपविण्यात आले.

बांधकाम सुरु असताना छत्रपतीं तिथे आले होते. त्यांच्या उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा तिथे अजूनही आहे. त्यावेळीच आग्र्याची घटना घडली. औरंग्याने महाराजांना नजरकैदेत ठेवले.

इकडे सिंधुदुर्गच्या कामाला पैसे कमी पडले. हिरोजींनी आपली या कामासाठी आपली खाजगी संपत्ती विकली. अठरा टोपकरांच्या छाताडावर हिरोजींनी हा सिंधुदुर्ग उभा केला. महाराज आले.. सिंधुदुर्गाचे भक्कम रुप पाहून आनंदित झाले.

"हिरोजी शाब्बास..! सांगा आपल्याला काय हवय ?" हिरोजींनी छत्रपतींना नमस्कार करत नम्रपणे कांहीच नको, असे सांगितले. नंतर राजगड सोडून रायगड ही राजधानी करण्याचे ठरले. साहजिकच बांधकामाची जबाबदारी हिरोजींच्यावर आली.

शिवछत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली हिरोजींनी सुरक्षित गड उभा केला. राणीवसा, जगदीश्वरांचे मंदिर, हत्ती तलाव, महादरवाजा, बाजारपेठ या साऱ्या गोष्टी खूपच विचारपूर्वक बांधल्या. त्याचबरोबर पाचाडला आऊसाहेबांचा वाडाही सुरेख झाला.

महाराजांनी पुन्हाः विचारले तर हिरोजींनी राज्याभिषेकानंतर पाहू, असं सांगितले. राज्याभिषेक थाटात पार पडला. दुसऱ्या दिवशी दरबाराचे काम सुरु झाले. महाराज जगदीश्वरांचे दर्शन घेऊन महादरवाज्यावर आले. समोर हिरोजी इंदूलकर हातात एक घडविलेला दगड घेऊन उभे..

"बोला, हिरोजी काय हवं आपल्याला.. दरबारातील ध्वनीयोजना लोकांना अचंबित करतेय.." हिरोजी म्हणाले,  'महाराज या पायरीला एक दगड बसवायचा ठेवलाय. मला दुसरे काहीही नको, या दगडावर सेवेची ठायी तत्पर हिरोजी इंदूलकर एवढे लिहायची परवानगी द्या..'

"हिरोजी,काय हा वेडेपणा..' हिरोजी पुन्हा म्हणाले, "महाराज, जेव्हा जेव्हा आपण या पायऱ्यांवर पाऊल ठेवाल तेव्हा ते पाऊल मला माझ्या माथ्यावर आशीर्वादासारखे वाटेल". असे म्हणून हिरोजींनी तो दगड त्या पायरीवर ठेवला आणि महाराजांच्या पायाशी झुकले.

महाराजांनी अभिमानाने या स्वराज्यनिष्ठ मावळ्याला कवेत घेतलं. माथ्यावर आलेल्या सुर्यांनेही या दोघांवर किरणांची पुष्पवृष्टी केली. महाराष्ट्राची ही पायरी चंद्रसुर्य असेपर्यंत निष्ठेची गाथा सांगत राहिल...

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)

(आम्हाला फॉलो करा - MBP Live24)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !