अहमदनगर - जिल्ह्यात गावठी कट्टा विक्री काही केल्या थांबायला तयार नाही. राहुरी आणि एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन सराईत गुंडांना जेरबंद केले आहे.
या तिघांच्या ताब्यातून ४ गावठी कट्टे, १२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी एक जण राहुरी फॅक्टरी येथे येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या बातमीची खात्री करून कारवाई केली. राहुरीमध्ये किशोर बाळासाहेब खामकर (वय ३२, रा. राजुरी, ता. राहाता) व किशोर साईनाथ शिणगारे (वय २८, रा. गोमाळवाडी, ता. नेवासा) यांना पकडले.
त्यांच्याकडे २ गावठी कट्टे, ६ जिवंत काडतूसे, व प्लेझर मोपेड असे एकूण १,२१,२०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला. स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार सोपान गोरे, सहायक फौजदार राजेंद्र देवमन वाघ, संजय खंडागळे, बापुसाहेब फोलाणे, भिमराज खर्स, देवेंद्र शेलार, रविकिरण सोनटक्के यांनी ही कारवाई केली.
याप्रकरणी सहायक फौजदार राजेंद्र वाघ यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. औरंगाबाद नगर रोडवर शेंडी बायपास चौकामध्ये मोटार सायकलवर औरंगाबाद दिशेने आलेल्या एका युवकाला पोलिसांनी पकडले.
त्याचे नाव अभय अशोक काळे (वय २४, रा. शिरसगांव, ता. नेवासा), असे आहे. त्याच्या सोबत असलेला दुसरा साथीदार मात्र पळून गेला. अभय काळे याच्याकडे देशी बनावटीचे २ पिस्टल (गावठी कट्टा) व ६ जिवंत काडतुसे असा एकुण ५१,२०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला.
त्याचा जोडीदार विवेक लक्ष्मण शिंदे (रा. घोगरगांव रोड, टाकळीभान, ता. श्रीरामपूर) हा फरार झाला. गावठी कट्टे व जिवंत काडतुस त्याने सागर रोहिदास मोहिते (रा. शिरसगांव, ता. नेवासा) याच्याकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फरार असलेले विवेक शिंदे आणि सागर मोहिते हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. आता पोलिस त्यांच्या शोधात आहेत.