नाशिक - जिल्ह्यातील मनमाड जवळ असलेल्या 'हडबीची शेंडी'वर नगरच्या 'इंद्रप्रस्थ ट्रेकर्स'च्या गिर्यारोहकांच्या पथकाला अपघात झाला. यामध्ये तांत्रिक पथकातील दोघेजण दगावले असून एक गिर्यारोहक गंभीर जखमी झाला.
अनिल वाघ आणि मयुर म्हस्के असे गतप्राण झालेल्या गिर्यारोहकांची नावे आहेत. अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर्स या कमर्शियल ग्रुपच्या वतीने हडबीची शेंडी या सुळक्यावर आरोहण मोहिम आयोजित करण्यात आली होती.
या मोहिमेत १८ जण सहभागी झाले होते. यामध्ये काही मुलींचा देखील सहभाग होता. दुपारपर्यंत सर्वांनी यशस्वी चढाई केली. नंतर सर्व सहभागी सदस्यांना खालच्या टप्प्यावर उतरवण्यात आले. शेवटचे तिघे जण उतरत होते.
तेव्हाच तांत्रिक पथकाचे प्रमुख अनिल वाघ आणि मयूर म्हस्के हे दोघे उंचावरून खाली कोसळले. त्यातला एक जण जागीच ठार झाला. तर आणखी एका जखमी असलेल्या प्रशांत पवार याला मनमाड येथे उपचारासाठी तातडीने हलवण्यात आले.
या अपघाताची माहिती समजताच कातरवाडी येथे राहणारे ग्रामस्थ भागवत झालटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ताबडतोब हडबीची शेंडी येथे धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. ग्रामस्थांनीच राबवलेल्या या बचावकार्यात सर्व सहभागींना संध्याकाळपर्यंत खाली आणले.
मृतांचे शव मनमाड येथे आणले, अशी माहिती मनमाड ते गिर्यारोहक प्रवीण व्यवहारे यांनी दिली. दरम्यान नगरहून 'ट्रेककॅम्प डिस्कव्हर अननोन'चे विशाल लाहोटी आणि काही सहकारी नाशिककडे मदतकार्यासाठी रवाना झाले.
अनिल वाघ (वय ३७, सावेडी रा. नगर) यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले, दोन विवाहित बहिणी, असा परिवार आहे. तर मयुर म्हस्के (वय २१, रा. दहिगाव ता. नगर) याच्या पश्चात आई, वडील, आजोबा, विवाहित बहिण असा परिवार आहे.
अनिल वाघ आणि मयुर म्हस्के हे दोघेही आपल्या पालकांना एकुलते एक होते. तसेच ते मामा भाचे असल्याची माहिती नगरच्या गिर्यारोहकांनी दिली आहे. या गिर्यारोहकांच्या निधनामुळे नगरच्या ट्रेकर्सनी हळहळ व्यक्त केली आहे.