दि. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व महात्मा जोतिबा फुले यांची एकत्रित जयंती घोडेगांव येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली.
डॉ. बाबासाहेबांचे कर्तृत्व जगापुढे दैदीप्यमान सूर्यासारखे लखलखीत आणि सत्य आहे. बाबासाहेबांनी कोण्या एका जाती धर्मासाठी कार्य केले नाही, तर त्यांनी समता, मानवता व बंधुता राष्ट्रात नांदावी व लोकशाही विश्वात श्रेष्ठ व्हावी, यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावून दूरदृष्टीने सर्व जाती धर्मासाठी काम केले.
आज जागतिक स्तरावर त्यांच्या बुद्धी कौशल्याचे व तेजस्वी ज्ञानाचे कौतुक होते आहे. चिकाटी परिश्रम व तेजस्वी बुद्धी या जोरावर त्यांचे कर्तृत्व झगमगून गेले. महात्मा फुले व सावित्री फुले यांच्या त्यागाने स्त्री शिक्षण गतिमान झाले व बाबासाहेबांनी फुलेंना गुरु मानून तो वारसा अविरतपणे पुढे चालवला.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून सर्वप्रथम त्यांची जयंती साजरी करणारे महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना गुरु मानले. शिवरायांनी सर्व अठरापगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य उभे केले.
कोणत्याही जाती धर्माचा द्वेष कधी केला नाही म्हणूनच त्यांना बहुजनप्रतिपालक म्हटले जाते. आपल्या दैदीप्यमान कार्य प्रेरणेने जगासमोर आदर्श निर्माण करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज..!
म्हणतात ना की, शिवरायांचे नाव घेऊन बाबासाहेबांचा द्वेष करणारा कधीच मराठा होऊ शकत नाही आणि बाबासाहेबांचे नाव घेऊन शिवरायांचा द्वेष करणारा कधीच बौद्ध होत नाही. कारण कोणत्याच महापुरुषांनी कधीच जातीवाद केला नाही, आणि आपल्याकडून अशी चुक होत असेल तर आपल्याला या महापुरुषांची नावे घेण्याचा कोणताच अधिकार नाही.
काल घोडेगांवमध्ये खऱ्या अर्थाने जयंती साजरी झाली असे वाटले. कारण देशभरात जातीपातीचं आणि द्वेष्याचं राजकारण चालू असताना घोडेगावात मात्र या सर्व गोष्टींना डावलून सामाजिक एकोप्याच दर्शन घडल्याच दिसून आलं.
सर्व जाती धर्माचे लोकांनी एकत्र येत जयंतीची शोभा वाढविली व एक आदर्श गावापुढे निर्माण केला की, देशात काहीही होऊ दे पण गावातील सामाजिक एकोपा आम्ही कधीही बिघडू देणार नाहीत. याचा पुरावा म्हणजे कालची जयंती.
घोडेगांव चोफुला या ठिकाणावरून मोठ्या उत्साहात प्रमुख पाहुण्यांच्या अभिवादनानंतर मिरवणूकीला सुरुवात झाली, आणि मिरवणूक गावातून आंबेडकर चौकात आली. मिरवणूक गावातून जात असताना सर्व धर्मातील लोकांनी सहभाग घेत या मिरवणूकीची शोभा अजून वाढविली.
त्याचप्रमाणे तालुक्यातूनही अनेक बांधव या जयंतीसाठी आले होते. हातात निळा, हिरवा, भगवा झेंडा घेऊन नाचत असणारी मुले खरोखर मनाला सुखाचा दिलासा देत होती. एकतेचे दर्शन घडवित होती. हेच कालच्या जयंतीचे खरे वैशिष्ट होय. हे सर्व चित्र बघून असे वाटले की खऱ्या अर्थाने कालची जयंती साजरी झाली.
त्या सर्व बांधवांचे अगदी मनापासून आभार! ज्यांनी मतभेद व जातीभेद बाजूला ठेवून जयंतीची शोभा वाढविली. असाच बंधुभाव गावात नेहमीच टिकून रहावा हीच अपेक्षा काल गावातून निर्माण होत होती.
- प्रशांत लोंढे (घोडेगाव, जि. अहमदनगर)