जिथे आपण रहातो तो आपला देश खूप सुंदर आहे. टिव्हीवरील बातम्या पहाताना, आपल्या जगण्याच्या गरजा बदलल्या आहेत की बदलवल्या जात आहेत, असं आता वाटू लागलंय.. हो. गरजा बदलल्या आहेत.
दिवसभर नोकरीसाठी वणवण फिरणारा मुलगा अस्वस्थ होऊन तिसऱ्याच वाटेवर तर जाणार नाही ना..? ही चिंता भेडसावणाऱ्या वडिलांना त्यांच्या उतरत्या वयात हे काय मांडून ठेवलंय आपल्या आयुष्यात, असं आता वाटू लागलंय.. चिमुकली मुलेसुद्धा भोंग्यावर मत देऊ लागलीत..
भक्तिभावाने म्हटला जाणारा चालीसा स्वताच्या स्वार्थापायी राजकारण्यांनी आपल्या दारासमोर आणून ठेवलाय. परमेश्वर उपासनेत श्रद्धा असायला हवी, पावित्र्य असावं.. मग हा हट्ट म्हणजे धर्माचा कळवळा की केवळ स्वतःच राजकारण साध्य करण्याचा डाव..?
अन् माणसेही याला बळी पडू लागलीत. महागाई, बेरोजगारी, रोजचा संघर्ष हे सोडून आपणही आता भावनेच्या आहारी जाऊ लागलो आहोत. शोकांतिका आहे. विलक्षण भीतीदायक आहे हे सगळं. जपून ठेवलेला विचार सुटत चाललाय..!
सगळंच असुरक्षित. एकात्मता. बंधुभाव संपला जाऊ लागला की काय असं वाटू लागलंय. शंभरी केव्हांच पार केलेलं पेट्रोल.. हजारी ओलांडलेला गॅस सिलिंडर.. सीएनजी, पीएनजी सुद्धा. किराणा दुपटीच्या पुढे..
महागाईने रोजचं जगणं मुश्किल झालं असताना स्वप्न पहायची इच्छा होणार कोणाला..? धार्मिक प्रेम् मग ते कोणत्याही धर्माचं असो.. काही लोकांना त्यांचा अजेंडा चालवायचा की स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचाय ?
खरोखरीच या लोकांचं धर्मावर प्रेम आहे की बेगडी..? विचारांची, धर्म प्रेमाची खोली बुजत चाललीय.? हे असंच चालु राहणार का..? उद्या काय उत्तरे द्यायची.? ते म्हणतीलच, तेव्हा तुम्ही कुठे होतात..?
- जयंत येलुलकर (अहमदनगर)