आमच्या कुटुंबातील सदस्य आमचा लाडका कुत्रा जिमीला दररोज सकाळी फेरफटका मारायला बाहेर घेउन जावे लागते. दिवसांतून दोन तीन वेळेस बाहेर त्याचं फिरणं हे ठरलेलंच. तो त्याचा दिनक्रम झालाय..
तरी देखील अधून मधून तो एखाद्या वेळेस बाहेर घेऊन जाण्यासाठी मागे लागत असतोच.. परवा जिमी असाच संध्याकाळी बाहेर घेऊन जाण्यासाठी हट्ट धरू लागला.. थोड्याच वेळापूर्वी याला चक्कर मारून आलो. तरी हा पुन्हा कशाला हट्ट धरतोय. की उगीचच त्रास देतोय, म्हणुन मी त्याला रागावलो.
वाटलं आता गप्प बसेल.. तरी पठ्ठ्या काही ऐकेच ना... म्हणून आलो त्याला थोडा वेळासाठी खाली घेऊन.. पहातो तर बाहेर त्याला दररोज भेटणारे त्याच्या जात कुळीतील त्याचे दोन मित्र खाली त्याची वाटच पहात उभे होते.
अगदी लक्षात येतील असे की जणु जिमीच्या खाली उतरण्याची वाटच पहात उभे असावेत. अन् हे महाराजही लगेच त्यांच्या जवळ जात त्यांच्या भाषेत प्रेमान गप्पा मारू लागले.. भुंकत नव्हती बरं का.. पण डोळ्याने, शेपूट हलवत, एकमेकांसोबत खेळायलाही लागली ही दोस्त कंपनी...
मनात म्हटलं याला बाहेर यांना भेटण्यासाठी यायचं होतं तर. एक मात्र वाटू लागलं, जिमीच्या या दोस्तांचा खालून कोणता आवाज आला नाही की त्यांचं भुंकण नाही. याला हे दिसले नाही. एकमेकांना पाहिलंही नाही, याचं कारण आम्ही राहतो पहिल्या मजल्यावर. त्यात दार बंद. मग जिमी अचानक मला खाली यायचा हट्ट तरी का धरू लागला..?
याला खाली आपल्या सवंगड्यांना भेटायचं होतं...! त्यांना भेटून त्यांच्याशी दोन मिनिटे खेळून जिमी पुन्हा मला वर घेऊन आला देखील... खरंच ही आपापसातील टेलिपथी तर नसेल.. जिमीची व त्याच्या या दोस्तांची.. जशी माणसात असते.. तशी प्राण्यात देखील नक्कीच असु शकते.
मुक्या भावना त्यांच्यात असतीलच...! विधात्याने आपल्या हातानं किती चमत्कृतीपुर्ण सृष्टी निर्माण केली असेल ना... त्याच्या लेखी आपण काय किंवा कोणी कुत्रा काय. सगळे प्राणीच. आपण बोलू शकतो. विचार करतो. म्हणून या सृष्टीत सर्व शक्तिमान म्हणुन आपण स्वताला समजत असतो.
भावना मात्र प्रत्येक जिवात असतात. हेच खरं. माणूस जेव्हा आपल्या मैत्रीची, नात्याची, प्रेमाची भावना व्यक्त करत असतो. कधी कधी यावर विश्र्वास ठेवावा की नाही, असा देखील विचार आपल्या मनात येत असतो. याच्या डोळ्यांतील अश्रुंवर विश्र्वास तरी किती ठेवावा हा देखील प्रश्र्न पडतो आपल्याला.
माणसांची खरी दुनिया कुठे विरून गेलीय..? असं वाटून जात असतं आपल्याला मग. म्हणूनच, जिमी जेव्हा आपुलकीनं जवळ येऊन बसतो. त्याच्या डोळ्यांत खरेपणा दिसू लागतो. जिवंत भावनांच दर्शन असतं ते...
- जयंत येलुलकर (अहमदनगर)