आमच्या हातात बांगड्या आहेत म्हणून आम्हाला कमजोर समजायची चूक करु नका..

बांगड्या एक आभूषण. या आभूषणाने कधीच बाईचं मनगट कमजोर झालं नाही. बांगड्या घालून तिने राक्षसवध केला, बांगड्या घालून ती युध्दभूमीवर उतरली.. बांगड्या घालून पिढ्यानपिढ्या सडा, सारवण, दळण कांडण करत राहिली..!


कधी व्यत्यय नको म्हणून बांगड्या काढून शस्त्रक्रिया करत राहिली. विमान लिलया चालवत राहिली. कामं करताना काढून ठेवल्या तरी कायमच्या नाही काढल्या. सणासमारंभात ती आवडीने आपले हात या आभूषणांनी भरते. इथे ती दुबळी नसते. ते तिला आवडतं म्हणून.!

अर्थात- या आभूषणांत तिचं अस्तित्व कोणी शोधू नये, आणि तिला कमजोरही म्हणू नये. पुढची पिढी बांगडी घालेल असं वाटत नाही. कारण तिच्या मनाच्या बांगडी पुरुषी अंहकार शिवीत तडा देत राहिला. बांगडी शिवीत मर्यादित होत राहिली.!

नाजूक बायलेपणाची ओळख म्हणून बांगडी राजकारणात मिरवू लागली आणि नेत्यांना आहेरात मिळू लागली. पुरुषी अंहकार बांगडी म्हणजे कमजोरी.. तुझी इज्जत त्या बांगडीत असं बजावत राहिला, आणि बायाही कित्येक पिढ्या या असत्याला सत्य मानून पिचलेल्या बांगडीसारख्या पिचत राहिल्या..!

"बांगड्या भरा" ही शिवी म्हणजे काय बाई कमजोर.. दुबळी.. तिने रहावं घरी.. हाच त्याचा अर्थ.! बायांनी का घ्यावा भाग असल्या आंदोलनात.! आपणच कबूल करायचा का हा दुबळेपणा..!

अहिल्याबाई होळकर राघोबादादा पेशव्यांना ठणकावताना एके ठिकाणी म्हणतात, "आमच्या हातात बांगड्या आहेत म्हणून आम्हांला कमजोर समजायची चूक करु नका, तुमची जागा दाखवण्याइतकी हिंमत आणि पराक्रम आम्हीही बाळगून आहोत."

आई, बहिण, बायको यांच्यावरच्या शिव्या.. फालतू विनोद बंद झालं पाहिजे. तरच ते वुमन्स डे, मातृदिन साजरा करण्याला अर्थ आहे.

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !