चार वर्ष झाले गाव सोडून जालन्याला रहायला गेलेलो, गावचे घर सोडून नवीन घरटं उभारण्यासाठी.. पुन्हा नव्या उमेदीने, नव्या जिद्दीने.. याला वर्षामागून वर्ष उलटत गेली आणि आता तर चार वर्ष होत आली..
मला देखील मुंबईला येऊन दीड वर्ष झाली. पण अद्यापही घरच्या मायेची ऊब तितक्याच प्रखरतेने टिकून आहे, जितकी गावच्या घरी रहायचो तेव्हा होती. कोरोनामुळे संपूर्ण जगाची घडी विस्कळीत झालीये.
नाविलाजाने २१ दिवस संपूर्ण काम बंद करून सरकारने सगळ्यांना आपापल्या घरट्यात (घरी) पाठवले. म्हणून आम्ही देखील गावी असलेल्या घरी येण्याचे ठरवले. आम्हीही सगळे गावी आलो.
पप्पांनी आमच्या विश्वासू पार्वतीबाई आणि भाभी यांच्याकडून संपूर्ण घराची साफसफाई करुन घेतली. त्यातच कपाटाची आवरा आवर करताना काही जुने पेपर सापडले. ते पाहत पाहत अशीच काळासोबत पाठीमागे गेले..
त्या पेपरमध्ये माझी सर्वस्व असणारी माझा जीव असणारी माझी आई, काळाच्या पडद्याआड गेल्याची आणि काळजाला धस्स करणारी बातमी दिसली. सगळीकडे आरडाओरड, रडण्याचा आवाज यायला सुरुवात झाली. मी अगदी सुन्न झालेली.
स्मशानशांतता अशी भयाण शांतता माझ्या मनात घर करून बसली. कालांतराने सगळे आवाज शांत झाले आणि डोळ्यासमोर दिसू लागल्या त्या जमलेल्या लोकांच्या हालचाली, सगळे रडत होते. काही जण पप्पांचं सांत्वन करत आहेत, तर काही भैय्याचं..
दिदीजवळ काही घरातली माणसं आहेत.. कुणी तरी मला धरून बाहेर अंगणात आणले.. सगळं कळतंय पण वळत नाही, असं झाले. मी सुन्न होऊन आईच्या चेहऱ्याकडे पाहतेय. असं वाटले कि आई आता डोळे उघडून माझ्याकडे बघेल.. पण ते कधीच शक्य नाहीये.. सगळीकडे भयाण शांतता.
अचानक 'आई' अशी दिदीची जोराची आरोळी ऐकायला आली आणि मी एकदम शुध्दीत आले. समोर काहीच नव्हते. ते जमलेले माणसे, ते नातेवाईक, सगळे अचानक गायब झाले आणि अचानक माझी नजर गेली ती हातातल्या पेपरवर. त्यात आई कायमचं सोडून गेल्याची बातमी होती, चार वर्षापूर्वीची. मी निशब्द होते, आणि आहे..
- पुजा सोळंके - पठाडे (मुंबई)