स्वतःच्याच प्रेमात पडलेली माणसं मला जगातील सर्वात सुंदर माणसं वाटतात. छान असतात अशा व्यक्ती. नेहमी आनंदी राहणाऱ्या, कधी कोणत्याच गोष्टीचं प्रदर्शन न मांडणाऱ्या.. सहजसुंदर.. निसर्गमय.. आत-बाहेर निर्मळ.. चैतन्य चित्त.!
जे स्वतःला जपतात किंवा स्वतःचा आदर राखून वागतात.. तेच लोक इतरांना जपतात किंवा इतरांचा आदर करू शकतात.
जगातल्या सर्व चांगल्या गोष्टींना मनापासून दाद देणाऱ्या.. शक्यतो कोणाच्या भानगडीत न पडणाऱ्या.. परंतु अशी एखादी नितळ व्यक्ती.. मैत्रीखातर जर पाठीशी उभी राहिली तर कणखर साथ देते. अगदी पहाडासारखी पाठीशी राहून.. एकच अट. तुम्हीदेखील त्यांच्याशी नितळ राहिले पाहिजे.
कधी मानसिक गुंता झाला तर सहज मार्ग दाखवणारे मैत्र म्हणजे अशी मंडळी. असे मैत्र लाभणे म्हणजे खरंच भाग्य. आणि असे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असणारे खूप मैत्र या फेसबुकच्या माध्यमातून मिळाले.
कोणा एकाचे नाव नाही घेणार. प्रत्येक व्यक्ती विलक्षण आहे. काहींची भेट झाली.. काहींची त्यांच्या लिखाणातून.. वैचारिक भेट झाली आणि लिखाणातले अंतरंग लुभावून गेले. मैत्री अशी काही एका दिवसापुरती किंवा सप्ताहापुरती नक्कीच मर्यादित नाही.
ते एक आत्मिक नातं आहे. सुंदर विचारांचं. भावनांचं. अस्मितेचं अस्मितेशी जोडलेलं. कदाचित माझे शब्दही अपुरे पडतात वर्णन करायला.. पण तरीही हा तोकडा प्रयत्न. 'मैत्री सप्ताह' निमित्त सर्वांनाच मनापासून शुभेच्छा..!
- डॉ. मानसी पाटील (पुणे)