अमृता शब्दांची महाराणी. ३१ ऑगस्ट १९१९ रोजी पंजाबात जन्मलेली अमृता. आज एकशे दोनव्या वर्षात पदार्पण करतेय. तिच्या कविता, साहित्य जणू बाईच्या वेदनांची, काढलेली रांगोळी त्यात कित्ती शब्दांचे रंग भरावे.. वेदना, वात्सल्य, प्रेम, लालसा, सारं काही भरभरुन..!
अमृता जगली तिच्या पध्दतीने. तिचंच आयुष्य आणि तिचेच कायदे. अमृता अक्षरांची उपासक आणि इमरोझ रंगात खेळणारे चित्रतपस्वी. पण ही दोन माणसं मनस्वी म्हणूनच एकत्र आली असावीत.
इमरोज या पारशी नावाचा अर्थ 'आज'. इमरोजसह अमृता आज जगली. भूतकाळ आणि भविष्यकाळाला विसरुन. आता सर्रास चालणाऱ्या लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये दोघेही वयाचं, जातीचं, समाजाचं, सारी कुंपण तोडून एकत्र राहिले.
इमरोझ लिहतात, ज्या जोडप्यांना परस्परांच्या प्रेमाची खात्री नसते त्यांनाच समाजाच्या मान्यतेची गरज भासते. आमची मने आम्ही जाणतो तर समाजाची लूडबुड हवी कशाला.? रोज दुसऱ्यांच्या आयुष्यात, घरात काय चाललंय, या चौकशा करणाऱ्या चोंबड्या लोकांना हे समजणार नाहीच.
साहिर मुंबईला गेल्यानंतर अमृताजी तुटून गेल्या आणि इमरोज अमृताच्या आयुष्यात आले. अमृताजी लिहतात, "इमरोज म्हणजे माझ्या आयुष्याची मुक्ती आहे." शरीराच्या नात्यापलीकडे एक मंगल असं बंधन दोघात होतं.
इमरोझ अमृताजींना वेगवेगळ्या नावानी हाक मारत. कधी माजा कधी मेरी बरकत.. अमृताजींना ते ही माझी आई म्हणत, कधी सखी म्हणत.. निस्वार्थी प्रेमाची ही अमर गाथा आहे.
कधीकधी अमृताजी साहिरच्या आठवणींने व्याकूळ होत. चित्र चितारणाऱ्या इमरोजच्या पाठीवर बोटाने अक्षर उमटत. साहिर. साहिर. पण आपल्या या मनस्वी सखीच्या मनाला जुळलेला हा सखा हसतहसत तिला तिची जगण्याची स्पेस देत होता.
तो साहिरचा फोटो घरात लावतो, यावरून तो अमृताच्या मनाचा किती विचार करत होता.. हेच लक्षात येतं. उतारवयात आजारी पती प्रितमजींना अमृता घरी आणते. इमरोज इथेही तिची साथ देतात. कुठल्या मातीची घडली होती ही माणसं..!
म्हणूनच अमृताजींचा मुलगा आणि सून इमरोजजींच्या बरोबर आदराने वागत. उमा त्रिलोक लिखित अनुराधा पुनर्वसू यांनी अनुवादित केलेले इमरोज आणि अमृता हे पुस्तक वाचताना आपल्याला इमरोझ आणि अमृता नव्याने कळतात.
'रसिदी टिकट' हे छोटेखाणी आत्मचरित्र अमृताजींच्या प्रांजळपणाची साक्ष आहे. जसे जसे अमृताजींचे साहित्य आपण वाचतो आणि आपण त्यांच्या प्रेमात पडतो. अमृता एका कवितेत म्हणते, "तुम इस जनम मेरी रुह को देखो.. अगले जनम मैं सर से पाँव तक और, शहर से गाँवतक तेरी रहूंगी"
या अशरिरी प्रेमाला पाहून मन थक्क होते. तृप्ती प्रेमाला थांबवते. अतृप्तीत माणूस झपाटल्यासारखा प्रेम करत रहातो. पंजाबची सिंहीण असो वा साहित्य अकादमी वा पद्मश्री हे सारे मिळवणाऱ्या अमृताजी प्रथम महिला.
इतकचं काय बुल्गारिया, फ्रान्ससारख्या देशांनीही साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. म्हणतात गेलेल्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाहीत. पण अमृताजी आपल्या शब्दांतून आपल्याला भेटत रहातात. भेटत राहातील. म्हणून अमृताजी जनम दिनकी बधाई..!
माझी एक आवडती कविता मी अनुवादित केलीय...
मी तुला पुन्हा भेटेन...
कुठ कसं, कधी ते माहित नाही
पण तुला नक्कीच भेटेन
कदाचित तुझ्या कल्पनेची प्रेरणा बनून..
तुझ्याच कॕनव्हासवर उतरेन
एक गूढ रेषा बनून
मूकपणे पहात राहिन तुला
मी तुला भेटेन.
कसं.. कुठे माहित नाही..!
बनेन सुर्यांची किरण
तुझ्या रंगात मिसळून जाईन
रंगाच्या बाहुपाशी बसून
तुझ्या कॕनव्हासवर पसरुन जाईन
माहित नाही कशी, कुठे, पण
तुला नक्की भेटेन..
डोळे होईन वेध घेणारे
झऱ्यातील कोसळणाऱ्या पाण्यासारखे थेंब तुझ्या देहावर उधळेन..
आणि एक उबदार चाहूल बनून
तुझ्या उराशी बिलगेन..
माहित नाही कशी, कधी, कुठे
तुला नक्की भेटेन..!
इतकच माहित आहे
वेळ जे करेल
जन्मभर ते माझ्याबरोबर असेल
शरीर संपलं तर
सारेच संपते...
पण आठवणींचे धागे
ब्रम्हांडाच्या कणाक्षणात असतील
मी त्या क्षणांना घेईन
त्या धाग्यांना विणेन
मी तुला पुन्हा भेटेन
कुठे, कशी, कधी माहित नाही
मी तुला पुन्हा भेटेन..!
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)
(रंग विचारांचे या माझ्या लेखसंग्रहातून)