मुलीचं लग्नाचं वय झालंय.? मग आधी या गोष्टींचा विचार करायला हवा..

मुली कमी डोक्याच्या असतात, त्यांनी कमी शिकावं आणि लग्नाइतकं वय झाल की गपगुमान लग्न करावं, असं कर्मठ प्रवृत्तीच्या लोकांना वाटतं. पण वास्तविक परिस्थिती फार वेगळी आहे.

प्रत्येकजण आपआपल्या क्षेत्रात मास्टर असतात. ते पाहण्यासाठी आपल्याकडे दृष्टी हवी. मुलीने नवऱ्याच्या जीवावर ऐश करावी असं अनेकाना वाटतं. तिथूनच तिचं अवलंबित्व वाढत जातं. नवरा आणि बायको यांचं नातं मग आज्ञा देणारा आणि आज्ञेचं पालन करणारा, एवढंच उरतं.

एक मध्यमवर्गीय घरातील मुलगी, जी गावाकडून शहरात आलेली. ती उच्च शिक्षण घेते. नुकतीच नोकरीला लागलेली असते. तिला परिस्थितीची जाणीव असते. मिळणारा पगार, काही घरी पाठवते व काही स्वतःसाठी खर्च करते.

येणारा काळ महागाईचा आहे, आपल्यामध्ये अजुन शिक्षण घेण्याची क्षमता आहे, अजुन कष्ट करण्याची तयारी आहे. म्हणून ती अजुन उत्तम करियरसाठी शिक्षण चालू ठेवते. नोकरीही करते.

लग्नाचं वय झालंय, लग्न करावं, संसार करावा, नोकरी बास झाली, सौंदर्य निघून गेल्यावर स्थळ मिळणार नाही, असे अनेक लोकांचे सल्ले तिला येतात. तेंव्हा  वास्तवाला भिडणारा मुद्दा तिच्या मनात उपस्थित होतो.

आज माझ्याकडे तारुण्य आहे, या वयातच मी काहीतरी करु शकते, इथून मागे मला बऱ्याच प्रयत्नात अपयश आलं ज्यामुळे माझ्या अनुभावात वाढ झाली. हिच खरी सुरुवात आहे. आता ज्ञानाने स्पर्धेत उतरण्याची.

आणि आजवर मी पाहिलंय श्रीमंत असो की गरीब, मानसिकता, वैचारिकता आणि गरिबीमुळे म्हाताऱ्या माणसांची परिस्थिती सध्याच्या युगात फार दयनीय आहे. माझ्या आई वडिलांनी आयुष्यभर काबाड कष्ट केले आणि आयुष्याच्या शेवटी त्यांच्यावर लाचारीची वेळ येऊ नये.

म्हणून मी माझ्या कर्त्या वयात मेहनत केली पाहिजे. आई वडील जितके मुलाची तितकीच मुलीचीही जबाबदारी आहे. त्यांनी आपलं आयुष्य सुंदर बनवलं आपण का त्यांच आयुष्य सुंदर बनवण्यासाठी जगू नये.

राहिला लग्नाचा विषय, तर आधी करिअर मग पुढचा विषय. जर आपणच स्वतःच्या पायावर उभा नसू तर दुसऱ्यांना काय आधार देणार, लग्न म्हणजे नवऱ्याच्या जीवावर ऐश करणे नाही, तर दोघांनी दोघांना जपणं आणि त्या नात्यात एकमेकांचा आदर करणे.

वय कधी पळून जात नाही. आपले विचार पळतात. आपली मानसिक धारणा आपण तयार करतो. एकदा त्यात बदल केला की सगळं सुरळीत होतं.

- शुभांगी माने (श्रीगोंदा, अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !