कसलं एकतर्फी प्रेम.? 'नो मिन्स नो' हे आता प्रत्येकालाच कळायला हवं..

बारावीत शिकणारी अंकिता. सतत तिच्यामागे मागे येणारा शाहरुख.. तिने प्रतिसाद दिला नाही, दुर्लक्ष करत राहिली. मला होय म्हणाली नाहीस तर तुला ठार करीन, अशी धमकीही दिलेली. अंकिताने वडिलांना सांगितले. म्हणून 'आपण पोलिसात जाऊ', असं आश्वासनही वडिलांनी तिला दिलं. पण..

पण त्याच रात्री शाहरुख मित्रासह घरात घुसला अन तिला पेटवून दिलं.. पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्नं पहाणाऱ्या त्या कोवळ्या जीवाचा एका पुरुषी अंहकाराने जीव घेतला. हे फक्त आजचं एक उदाहरण नाहीय. अशी कितीतरी उदाहरणे दिवसागणिक घडताहेत.

शासकीय आकडेवारी नुसार दर अर्ध्या तासाला स्त्री अत्याचाराची घटना घडत आहे. याचं कारण विकृत मानसिकता हे एकच नाही. तर आम्ही नव्या पिढीला नकार पचवायची ताकद देऊ शकलो नाही. मुलांच्या मनातील पुरुषी वृथा अंहकार नष्ट करु शकलो नाही.

स्त्री पुरुषांसाठी अव्हेलेबलच असली पाहिजे ही वर्षानुवर्षे चालत आलेली पुरुषसत्ताक पध्दतीची मानसिकता कधी संपणार कोण जाणे.?

कारणे - शून्य ते पाच या वयोगटातील मुलांना तू पुरुष आहेस हे संस्कार केले जातात. मग जन्म होतो अंहकाराचा. दुःख हे पुरुषाने दाखवायचे नाही. कितीही दुःख झाले, वेदना झाल्या, तरी रडायचे नाही, हा पुरुष असण्याचा संस्कार (?) केला जातो.

वडिल जर आईशी तुच्छतेने वागत असतील, तर नकळतच बाई ही वस्तू हे त्याला वाटत रहातं.. आणि इथूनच त्याच्या पशु बनण्याचा प्रवास सुरु होतो. मग हाच मुलगा बहिणीला भांडतो, बायकोला मारहाण करतो, आईलाही शिवीगाळ करतो.

मी पुरुष आहे. मला प्रतिउत्तर देण्याचं धाडस बाईकडून होता कामा नयेच, हे अगदी या विकृत लोकांच्या मनात ठसलेलं असतं. किंबहुना लहानपणीच त्याच्यावर तसं बिंबवलं जातं. तिचा आदर करायचा त्याला कधीच शिकवलं जात नाही.

मग एखादी मुलगी त्याला नाही म्हणाली, की 'समाजासमोर माझा अपमान झाला, माझी समाजातील इज्जत गेली, लोक आता मला हसतील, अशा भ्रामक प्रतिष्ठेपायी, "अगर तु मेरी हो नई सकती तो किसी की भी नही" अशा सिनेमात ऐकलेल्या फालतू डायलॉग आत्मसात करत अशा घटना घडतात.

परवा मुलगी अजिबात भाव देत नाही, म्हणून तिच्या छोट्या भावाला मारुन टाकलं. कुठल्या काळजाची असतात ही विकृत माणसं.. 'नो मिन्स नो', हे कधी लक्षात येणार ? "तु हां कर या ना कर, तु मेरी है किरण' असले संस्कार हे चित्रपट करणार.

सैनिक, पराक्रम, देशभक्ती, युध्द यावरील चित्रपटही येतात. पण 'ते' देशभक्ती देशप्रेम वगैरे हल्ली सोशल मिडीयावर दाखवायच्या गोष्टी असतात. पण प्रत्यक्ष आचरणात आणायला या भंपक प्रेमवीरांना अतिशय अवघड असतं.

बाई ही 'वस्तू' नाही, ती 'माणूस' आहे. तिला तिच्या पसंतीप्रमाणे जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. हे पुरुषसत्ताक पध्दतीने स्विकारायला हवं. हल्ली सतत पोस्ट येत असतात. मुलींचे चॉईस वाढलेत..

शेतकरी नवरा नको म्हणतात. पण रानात शेती आहे म्हणून स्वतः शेती करणारे, कष्ट करणारे, विविध प्रयोग करुन शेतीसोबत जोडधंदे करणारे किती थोडे शेतकरी आहेत. बायोडेट्यात शेती असते. बाप राबतो, हा बसतो कुठल्यातरी ऑफीसात कारकुनी करत...

सतत मुलींच्या आईबापाला दोषी ठरवायचं, नकार आला की दुखावतो ना अंहकार, अरे ते चिडण्यापेक्षा नकारमागचं कारण शोध ना मुलांनो..

शाळा, कॉलेजमध्ये या विषयावर बोललं गेलं पाहिजे. सेक्स किंवा स्त्री-पुरुष शरीररचना हे एवढचं लैंगिक शिक्षणात येत नाही. तर भावना आणि स्त्रीचा आदर ह्याही गोष्टी यात येत असतात.

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात हल्ली अशा घटना विचारात टाकू लागल्या आहेत. सहमती म्हणजे काय ? हे शिकवायची गरज आहे, असं वाटू लागलं आहे. खर तर लैंगिक हिंसा हा फक्त स्त्रीचा प्रश्न नाहीच तो पुरुषांचाही आहेच. याचाही विचार शिक्षणतज्ञांनी करावा

प्रेम हे दोन माणसांत होत असतं. त्यात एकमेंकाच्यात होणारं आदान प्रदान, देणघेणंही असतं. ते दोन्हीही बाजूने असावं लागतं. सिनेमा बघून मनोरंजन होतं. दुसऱ्यांचे प्रेम मिळवता येत नाही. 'नो मिन्स नो' हे आता प्रत्येकालाच कळायला हवं..

- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !