अहमदनगर - खासगी प्रवासी वाहनांनी गर्दी हंगामाच्या काळात प्रवाशांकडून जादाची भाडे आकारणी करू नये. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ठरविलेल्या प्रत्येक किलोमीटर भाडे दराच्या ५० टक्केपेक्षा अधिक भाडे राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केली जात असल्यास प्रवाशांनी dycommr.enf2@gmail.com वर तक्रार नोंदवावी. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजी खासगी प्रवाशी वाहनांसाठी कमाल भाडेदराचा शासन निर्णय जारी केला आहे. खासगी बस मालकांनी महत्तम भाड्याबाबतचा विहित नमुन्यात तक्ता तयार करून व त्याप्रमाणे येणारा प्रती आसन दर दाखवावा, असे म्हटले आहे.
खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिध्द करावेत. तसेच प्रवाशांच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक देखील प्रदर्शित करण्यात यावा, असे आवाहनही या प्रसिध्दीपत्रकातून करण्यात आले आहे.