रोज भेटतात...
चांगली, वाईट प्रामाणिक माणसे..
बोगस. काही दिखावू..
कोणी बगळे..कोण कोल्हे..
सगळं भयाण आहे..
कोणाला लुटायचं
तर कोणाला बुजवायचं आहे..
उकळणाऱ्या लोकांना
आणखी ओरबडायचं आहे
त्यांना गंगा माहिती आहे..
भागीरथी ओळखीची आहे..
सीना जवळ असताना
तिचा मात्र काटा काढायचा आहे.
कोणाशी बोलावं.?
कोणाचं बोट धरावं...?
काही चांगली वाटली तरी,
कार्यकर्ते मस्तवाल तर कोणी संधीसाधू आहेत.
कुणाला उभारायचं आहे,
निर्माण करायचं आहे,
तर कुणाला,
त्यांचं तोंड दाबायचं आहे.
इथे कसली स्वप्न नाहीत..
ना कसली इच्छा आहे.
चांगल घडावं,
लोकांच्या मनात घर करावं,
असं कुणाला वाटत नाही..
दिवस निघून चाललेत,
वर्षे निघून गेली...
आशा विरून गेल्या...
स्वप्नांवर विश्वास आता राहिला नाही...
बंडल गेले खोके आले..
वाडे पाडून टॉवर झाले..
पूर्वीचा ओलावा त्यात आता दिसत नाही
सुक्या मेव्याच्या चवीला..
आईचा गोडवा येत नाही..
आईचा गोडवा येत नाही..!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)