समाजकारण, राजकारणामध्ये जनतेच्या सार्वजनिक प्रश्नांना बगल देत विकासाच्या मुद्द्यांना कानाडोळा करताना तिसरीकडेच लोकांचे ध्यान वळवून ठेवण्याची प्रवृत्ती जर वाढत असेल, तर हे काही फार चांगले चित्र नाही. याचा राजकारणातील सर्वच पक्षांच्या धुरिणांनी गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.
खालपासून वरपर्यंत लोकशाहीच्या विविध सभागृहात विकासाचे प्रश्न मांडून ते सोडवण्याऐवजी जनतेच्या सार्वजनिक प्रश्नांना बगल देत नाही ते आरोप, प्रत्यारोप करतांना केवळ आरोपांची स्पर्धा आयोजित करण्याचा चाललेला हा खेळ लोकशाहीमधे विकासासाठी तितकासा चांगला नाही.
एकाने दुसऱ्याचं एखादं प्रकरण बाहेर काढलं की दुसऱ्याने त्यांची चार प्रकरण बाहेर काढून चौकशीची मागणी करायची नंतर प्रकरणं 'सेटल' करुन, 'तेरी भी चूप मेरी भी चूप' करीत दाबून टाकायचं हा सगळा प्रकार सामान्य जनतेनं मात्र उघड्या डोळ्यांनी पहायचा, हे घृणास्पद आहे.
ज्याची त्याची चौकशी हा तर आता परवलीचा शब्द होऊन बसलाय. खरंतर एखाद्या प्रकरणात जर तथ्य असेल तर योग्य चौकशी व्हायलाच हवी. तशा यंत्रणा देखील आहेत. परंतु स्वतःचं काही दाबण्यासाठी दुसऱ्याच काही काढून आरोप करण्याचा फार्स करायचा. यातून काय साध्य होणार आहे..?
जनतेची दिशाभूल करण्याचा हा सगळा प्रकार आहे. नितीमत्ता सोडून देताना सध्याच्या काळात चालु असलेले असे प्रकार भविष्यासाठी किती हानिकारक आहेत, याचा विविध पक्षांच्या जबाबदार नेत्यांनी गांभिर्याने विचार केला नाही, तर ज्या सभागृहाला स्वतःची सभ्यता, आदब आहे, त्या सभागृहाच्या पावित्र्याला काळीमा फासणारी ही गोष्ट ठरेल.
लोकशाहीच्या या स्थानांची आपल्याकडून किती कुचेष्टा होतेय अन् हे डोळ्यादेखत घडत असताना कुणालाही याचे काहीही वाटू नये. याचा अर्थच विचारांचं, सभ्यतेचं, नितीमत्तेचं तसेच जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत आणण्याचं राजकारण करण्याचे दिवस केव्हाच संपले, असं समजायचं का?
हो. जनतेशी बांधिलकी ठेवत समाजकारण करण्याचे दिवस आता केव्हाच संपले आहेत. एखाद्याच्या ताटात आपली वाटी कशी ठेवता येईल, असाच प्रयत्न आता जो तो करतांना दिसतोय. माझा वाटा मात्र मोठा असायला हवा.. काम कसंही कर.. पण कमिशन आणून दे.
मग गुणवत्तेचे, बांधिलकीचे, कर्तव्याचे दिवस केंव्हाच संपले असच म्हणावं लागेल. पैशांचे दिवसेंदिवस वाढत चाललेले महत्त्व. त्यामुळे राजकारणातून पैसा अन् पैशातून राजकारण. ही वाढलेली प्रवृत्ती यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेपासून अगदी वरपर्यंत कामापेक्षा सौदेबाजीचं वाढतं चाललेलं महत्व घातक आहे.
याचा परिणाम उद्याच्या निकोप राजकारणावर किती होणार आहे, याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. विचारांची, जनतेच्या बांधिलकीची बैठक असणारी मोठी माणसे या महाराष्ट्राच्या राजकारणात होती. त्यांनी राज्याच्या विकासाला गती दिली. देशात राज्याला वैभव मिळवून दिले.
त्यांनी आपल्या सभागृहात केलेल्या महत्वपूर्ण भाषणांची पुस्तके देखील प्रकाशित झाली आहेत. या प्रेरणादायी राजकीय धुरिणांनी आपल्याला दिलेली ही विचारांची वाट आता मलिन होत चाललीय, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल..!
- जयंत येलुलकर (रसिक ग्रुप, अहमदनगर)
(लेखक माजी नगरसेवक आहेत)