इज्जते, शोहरते, चाहते, उल्फते,
कोई भी चीज़ दुनियामें नही रहती
आज मैं हू जहाँ,
कल कोई और था..
ये भी एक दौर है,
वो भी एक दौर था.
अब यहां कोई और है,
आज इतनी मुहब्बत ना दो दोस्तो
कल मेरे खातीर कुछ ना रहे
आज का थोडा प्यार बचा के रख
मेरे कल के लिए
कल जो गुमनाम था
वो आज सबका प्यारा होगा
वो भी एक दौर था,
ये भी एक दौर है..!
असं साहिर लुधियानवींनी लिहिलेलं कित्ती सत्य आहे. हे आपल्याला सतत जाणवत रहातं. सत्तेचा, पदाचा माज करणारी माणसं सत्ता गेल्यावर विकल, हतबत झालेली दिसतात.
बदल अपरिहार्य असतात. एक सतत लक्षात ठेवत रहायचं, ज्याला सुरवात आहे त्याला निश्चितच शेवट आहे. आज जे मी माझं माझं म्हणून म्हणत असते ते कधीतरी दुसऱ्यांच्या हातात जाणार असतं. हे बदल कधी पटकन होतात, कधी वाट पहायला लावणारे.
जानेवारीनंतर डिसेंबर यायला भारी वेळ लावतो. पण डिसेंबरनंतर जानेवारी लगेचच येतो. आहे की नाही गंमत. हे दोघं दूर जातात तेव्हा ऋतू बदलतात. जवळ येतात, तेव्हा चक्क वर्षचं बदलून टाकतात. आपल्या सत्तास्थानाला निरोप द्यायला लिलया जमायला हवं. कारण लोक नवं आलं की जुन्यांना विसरतात, ही साधी मानसिकता आहे.
साधं स्वयंपाकघर दुसऱ्यांच्या हातात द्यायला नको वाटणाऱ्या मुलांच्या हातात व्यवसाय, घराचा कारभार न देणारे कारभारी.. यांनी लक्षात ठेवायला हवं. की बदल ही काळाची गरज आहे, निवृत्ती ही आवश्यकता.
एखाद्या गोष्टीचा त्याग करताना काहीना त्रास होतो. कारण मन तयार नसतं. पण आपल्या मनाला सतत सांगत रहायचं, बदल अपरिहार्य असतात. आपण कोणीचं नसतो, निसर्गाने आपल्याला विस्मरणाचे वरदान की शाप दिलाय.
लोक उपकारकर्त्यांना, मदतकर्त्यांना चटकन विसरुन जातात. तेव्हा लोकांच्या डायरीत नको, पण मनात जागा करुया.. हेच वैश्विक सत्य आहे. विश्वात्मकांकडे ज्ञानदेवांनी मागितेलं पसायदान पहा. माणसांची वृत्ती ही सचेतन शक्ती आहे. तिला योग्य कार्य मिळायला हवं.
कारण आपल्यातील खळ.. खलत्व (वाईट प्रवृत्ती) जाओ, त्याचं सत्प्रवृत्तीत रुपांतर होओ. तसं आम्हांला हे सत्प्रवृत्तीचे पसाय मिळू दे. सर्व प्राणीमात्रांमध्ये प्रेम, मैत्र वाढीस लागू दे. ही ज्ञानदेवांची वैश्विक प्रार्थना जगता यावी. मन निरागस आणि निष्पाप होत जाऊ दे.
नव्या पिढीला यशवंत व्हा आणि ही विचारांची, सारस्वताची पालखी पुढे न्या हा शुभाशिर्वाद. जेष्ठांना आयुआरोग्याच्या सदिच्छा. परत तेच. बदल अपरिहार्य आहेत, स्वीकारुया.. अन् दुसऱ्यांना आनंदी करुया. तथास्तु.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)