नेवासा (अहिल्यानगर) – नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील मयूर रासने यांच्या कालिका फर्निचर दुकानाला सोमवारी मध्यरात्री अचानक भीषण आग लागून पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.
या आगीत रासने कुटुंबातील मयूर अरुण रासने (४५), त्यांची पत्नी पायल मयूर रासने (३८), दोन मुले अंश (१०) व चैतन्य (७) यांच्यासह अंदाजे ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तर, यश किरण रासने (२५) हा गंभीर जखमी असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मयूर रासने यांचे फर्निचर दुकान व त्याच्याच वरच्या मजल्यावर त्यांचे संपूर्ण कुटुंब वास्तव्यास होते. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
स्थानिक नागरिकांनी बचावकार्याचा प्रयत्न केला मात्र तोवर ज्वाळांनी मोठे रूप धारण केले होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आग लागण्याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.