तिला त्यागाचं महत्त्व पटवलं की
झालं..
तिला देव्हाऱ्यात बसवलं की
झालं..
त्याग केला तर देवत्वाला जाल,
या वल्गनेला भुलून ती आपलं माणूस असणं हरवते...!
ती स्वयंवरात जिंकली जाते,
कधी पाच भावात वाटली जाते..
राजसभेत एक वस्त्र असताना
फरफटवली जाते..!
धर्मराज पायाचा अंगठा उचलत नाही..
म्हणून श्रेष्ठ धर्नुधर काहीच बोलत नाहीत..
बोललेल्या भिमाला ती म्हणते,
पुढच्या जन्मी मोठा हो...
तिने पुढच्या जन्मी पाचाची पत्नी
होण जणू स्विकारलेले असते...!
सीतेची तर कथाच वेगळी..उर्मिलेची वेदना,अहिल्येचा अपमान,गांधारीचं सोसण,कुंतीच वापरलं जाणं...
तेव्हाची ती, अन् आताची ती..
बाईचा त्याग ग्लोरिफाय होतो..
आपणच तिची पुजा मांडतो...
अन
तिचं माणूस असणं विसरुन जातो..
- स्वप्नजा घाटगे (संपादक, सखीसंपदा मासिक, कोल्हापूर)