मनाचा अश्वत्थामा किंवा अश्वत्थाम्याचं मन..!

मन.
कायदेशीर वसाहतीचा ताबा,
बेकायदेशीर अवस्थेतील अजीर्ण बिंदू.
सुसाट वाहणारा वारा,
बेभानपणे कोसळणारा अवकाळ,
अवकाळाला सरकारचा विमा,
पण मन उपकाराला महाग..!

मन.
स्व नजरेनं भरणारा समाज,
समाजाच्या नजरेनं त्रयस्थ,
कुत्र्यासारखं भरकटणारं,
कुत्र्यावर प्रेम करणाऱ्या संस्था हजार,
पण मन मात्र अनाथाचं दार..

मन.
विचारांच्या अपघातात रोज ठार,
रस्त्यावर ट्रॅफिकचे नियम वांझोटे,
विसाव्याला सुद्धा नाही उसंत,
मनाला त्याचीच खंत, 
'माणसं' ओळखणारी 'माणसं' फार,
पण, 'मन' ओळखणारी सगळी चोर..!

मन.
आजार हजार,
उपायांची मारामार,
जगणं बेजार,
मन घोड्यावर बसून स्वार,
पण नाही दोन विचारांमधील अंतराचं भान..!

मन.
शून्य अवस्थेतील शांतता, 
जगण्याचा प्रत्येक क्षण
किंवा 'मन',
पिढ्यानपिढ्या गोचिडासारखा चिकटलेला (भरकटणारा) अश्वत्थामा,

किंवा अश्वत्थाम्याच्या मनाचा
मनुष्याला मिळालेला शाप..!
किंवा माणसाच्या मनामनात
क्षणाक्षणात भरलेला अश्वथामा..!

- कृष्णा यमुना विलास वाळके (अहमदनगर)
(लेखक कलाकार व प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक आहेत)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !