अहमदनगर - सामायिक प्लॉटच्या वादातून एका युवकाने सख्ख्या भावाला पोलिसांच्या तावडीत देण्याचा डाव रचला. त्यासाठी भारतात दहशतवादी आल्याची खोटी माहिती देणारा निनावी फोन पोलिसांना केला. पण त्याचा डाव त्याच्याच अंगलट आला असुन पोलिसांनी त्याला अहमदनगर शहरातून ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे की, मुंबईच्या मुख्य नियंत्रण कक्षामध्ये दुपारी १२ वाजेच्या सुमारास दक्ष नागरीक बुथवर राजा ठोंगे याने मोबाईलवरुन फोन करुन माहिती दिली की, मुंबई येथे दुबईवरुन पहाटे तीन इसम आले आहेत. ते अतिरेकी असुन त्यांचा पाकीस्तानशी संबंध आहे.
त्यातील एका व्यक्तीचे नाव मुजिब मुस्तफा सय्यद असून नगर पासिंगची गाडी आहे. या इसमांचा दोन नंबरचा व्यवसाय आहे, असे कळवुन ते पुण्यावरुन बोलत असल्याचे सांगितले होते. हा हॉक्स कॉल झाला होता.
हा कॉल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक यांचे मार्गदर्शनाखाली या गुन्हयाचा समांतर तपास नाशिक युनिटकडील अधिकारी व अंमलदार करत होते.
या गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गोपनिय बातमीदार यांचेमार्फत तपास करत असताना मुजिब मुस्तफा सय्यद यांचा चुलत भाऊ यासिन याकुब सय्यद याने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती दिली होती, असे निष्पन्न झाले.
खोटी माहिती देण्याचे कारण विचारले असता मुजीब सय्यद व आरोपी यासीन सय्यद यांचा भवानीनगर, अहमदनगर येथे साडेपाच गुंठ्याचा वडीलोपार्जित सामाईक प्लॉट असून त्या प्लॉटवरून वाद झाल्याची माहिती मिळाली.
या भांडणाचा राग मनात धरुन मुजीब व त्याच्या कुटूंबियांना पोलीसांकडून त्रास व्हावा या उद्देशाने खोटी माहिती देवून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपीने कोणत्याही प्रकारचा पुरावा मागे राहणार नाही याची दक्षता घेतली होती.
परंतु दहशतवाद विरोधी पथक, नाशिक युनिटकडील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास करुन अल्पावधीतच गुन्हा उघडकीस आणुन जनमाणसातील सुरक्षिततेची भावना कायम ठेवली आहे. या आरोपीना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई आझाद मैदान पोलीस ठाणे, मुंबई हे करत आहेत.