महान साहित्यिक शेक्सपियर यांचा स्मृतीदिन आणि इतर सर्व साहित्यिकांना आदरांजली म्हणून २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. शेक्सपियर यांच्या जन्मठिकाणी तिर्थासारखा दर्जा देऊन तिथे इ.स. १८४७ मध्ये राष्ट्रीय स्मारक बनवले आहे. इ.स. १९३२ मध्ये शेक्सपियर थिएटरची स्थापना करण्यात आली.
या दिवसाचा प्रमुख हेतू म्हणजे लेखक, प्रकाशक, प्रताधिकार (कॉपीराईट) यांचे महत्व आधोरेखित करणे हा आहे. लहानमोठे सर्वांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. पूर्वी तुकोबांची गाथा, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, भगवद् गीता प्रत्येक घरात आढळतच असे. बंगालमध्ये प्रत्येक घरात रविंद्रनाथांच्या पुस्तकांचा संग्रह अभिमानाने बाळगलेला असतोच. हल्ली मात्र आपण इतके सोशल मिडीयाच्या आहारी गेलोय की घराघरातील वाचनसंस्कृती जणू विसरुनच गेलो आहोत.
मुलं आता ऑनलाईन शिकत आहेत. ई बुक्स आलेत. माझा आधुनिक तंत्रज्ञानाला अजिबात विरोध नाही. पण चांदोबा, किशोर, फँटम, इसापनिती, अकबर, बिरबल इ. अनेक मनोरंजक कथांपासून सुरु झालेला माझा प्रवास आता अजूनही थांबला नाही. मराठी, हिंदी, बंगाली, कन्नड, अनुवादित पुस्तके. भारतीय शेक्सपियर म्हणून नावाजलेले महाकवी कालिदास यांच मेघदूत, कुमारसंभव, शांकुतल अभ्यासताना मन रमून जात असे.
जेवतानाही पुस्तके हातातून खाली ठेवणं जीवावर येत असे. आईचा ओरडा या पुस्तकांपायी किती खाल्ला आहे. कुसमाग्रजांच्या रसयात्रेचा अभ्यास करताना मिळालेला आनंद कुठलीही संपत्ती मिळालेल्या आनंदापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. पुस्तकांच्या या वनात कितीतरी दिग्गजांची पुस्तके माझं कपाटाला भूषण देत आहेत. 'ना बंगला, ना कार मांगू, बस्स किताब दे दो कौनसाभी.. असं आहे आपलं..!
मला वाटतं लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता बालसाहित्याची अजूनही खूप निर्मिती झाली पाहिजे. प-या, राक्षस यातून बालकथांनी बाहेर पडून त्यांना हल्लीच्या परिस्थितीला साजेसे साहित्य यायला हवे. हल्ली खूप समुह एकत्र येतात, पुस्तकं वाचतात आणि पुस्तक परिक्षणही करतात, हे पाहून बर वाटतं. पण..
कित्ती आवडायचा तो कोऱ्या पुस्तकांचा वास.
कधी थबकत पावलं,
त्या बघून कोपऱ्यातील किंमती.
पण त्या अक्षरांच्या सुंगधी वनात
वाचता छातीवर ते अक्षरांचे..
सुंगध घेऊन नकळत मिटत जाणारे डोळे..
वेगळ्याच जगात घेऊन जाई अक्षरांचे सुगंधी वन.
ते अक्षरांचे सुंगधी वन असले की
मला नको सखा वा सखी...
मग हवेहवेसे वाटते ते अक्षरांचे सुंगधी वन..
आणि रात्रभर त्याच्या मिठीत विहरणारी मी.
वाचत रहा.. तरच वाचाल. हो ना..!!
- स्वप्नजा घाटगे
संपादक, सखीसंपदा (कोल्हापूर)