आपल्या मूक अभिनयाने जगाला हसवणाऱ्या अवलिया चार्ली चॅप्लिनचा काल वाढदिवस होता. चार्ली अभिनयात श्रेष्ठ होतेच. पण ते फिल्म निर्माता, दिग्दर्शक, संगीतज्ञ, संगीतकारही होते. 'हसरे दुःख' वाचताना त्याच्या आईचा जीवनसंघर्ष वाचताना आपल्या पोटात गलबलून येतं.
आयुष्यात कितीही संघर्ष असला तरी ईश्वर आणि स्वतःवर विश्वास ठेव, असं सांगणारी त्याची आई म्हणजे प्रसिध्द अभिनेत्री लिली उर्फ हॅना चॅप्लिन. चार्ली पाच वर्षाचा असताना लिलीचा रंगमंचावर गाताना एका कार्यक्रमात गाताना आवाज एकदम चिरकला, तिला गायला येईना.
छोट्या चार्लीने त्यावेळी रंगमंचावर उतरुन ती वेळ मारुन नेली. मात्र लिली पायउतार झाली ती कायमची. तद्नंतर त्यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास चालू झाला. रंगमंचावरुन पायउतार झालेल्या हॅनाचे पाय शिवणयंत्रावर श्रमु लागले. चार्ली मिळेल ते काम करत होता.
परिस्थितीला दया येत नव्हती. कुणासमोरही कुठल्याही परिस्थितीत हात पसरायचे नाहीत. या आईच्या शिकवणीने त्याला परिस्थितीला सामोरं जायचं बळ मिळत होतं. चार्लीला अन त्याच्या भावाला आई करत असलेले कष्ट दिसत होते.
तू खूप मोठा होशील, तुला यश मिळेल, पण तु विधात्याला विसरु नको, असं ती चार्लीला सांगत असे. इतक्या हालअपेष्टा सहन करुनही विधात्याप्रति असलेली तिची निष्ठा मोठी खूप मोठी होती. त्यांच्या त्या अंधारलेल्या छोट्या खोलीत आई जेव्हा दिवा लावत असे, तद्नंतर तिची दिसणारी सावली पाहून चार्लीला आपल्या आईचं अप्रुप वाटत राही.
मृगजळासारखी सुखाची सतत इच्छा करत रहायचं मात्र दुःखाने सोबत करायची. परिस्थितीने त्यांना वर्कहाऊसला आणून सोडले. तिथेही नियतीने घाव घातलाच. आईला वेडाचा झटका आला. मुलं पोरकी झाली. कोर्टाने वडिलांकडे मुलांचा ताबा दिला. पण तिथे या मुलांनी प्रचंड सावत्रपणाचा छळ सोसला.
आई बरी झाल्यावर मुले तिच्याकडे गेली पण सतत शिवणयंत्रावर काम करुन तिची तब्येत ढासळली. अन तिचे निधन झाले. आयुष्याची १७ वर्ष प्रचंड दारिद्र्यात घालवून चार्लीने नृत्य, अभिनय, लिखाण हे गुण जोपासत ठेवले होते.
फ्रेड कार्नोंना त्याला काम देताना कधीही वाटलं नव्हतं, तो एवढा उच्च दर्जाचा अभिनय करेल असं वाटलं नव्हतं. कुणाचाही द्वेष, मत्सर न करता दुसऱ्यांकडून चांगल शिकावं, आपण आपल काम नेटाने करत पुढं जावं, या गुणांनी तो यशस्वी होत गेला.
तो अमेरिकेत गेल्यावर त्याने ठरवले आपलं करिअर इथेच या भूमीत घडवायचे आणि यशाची सोपानं चढत गेला. हे पुस्तक वाचताना कितिदा तरी माझे डोळे पाणावले, मन गहिवरुन आले. सतत दुःखाच्या वाटेवर चालताना, मन दुःखाच्या त्रासाच्या अनंत झळा सोसत त्याने दुसऱ्यांच्या आयुष्यात हसरे क्षण भरले.
संघर्षातून तेजाकडे जाणाऱ्या या अवलियाचा जीवनप्रवास मनाला चटका लावून गेला.दुःखाची खोली किती असावी याचे मोजमाप त्या विधात्याकडे तरी आहे का ? या यशस्वी श्रेष्ठ अभिनेत्यांस जीवनभर संघर्ष करावा लागला.
भाषेच्या बंधनाविना त्यानं अभिनयातून प्रेक्षकांशी संवाद साधला. प्रेक्षकांना गडबडा लोळायला लावलं पण त्याचबरोबर त्यानं डोळ्यात टचकन् पाणी आणून रडवलही. जागतिक पटलावर एक महानायक म्हणून वावरला !
स्वतःतल्या आत्मविश्वासामुळे अनेक वैशिष्ट्यपूर्ण युक्ता तो पडद्यावर साकारु शकला. त्याने सोसलेल्या दुःखाची कल्पनाही आपण करु शकत नाही. पण दारिद्रयातून सम्राट होणं आणि जगाच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करण ते आजही आणि उद्याही अबाधित ठेवणं, ही अप्राप्य गोष्ट चार्लीने साध्य केली आहे.
दि. १६ एप्रिल १८८९ ला चार्लीची जयंती.. 'माझे अश्रु कोणी पाहू नये, म्हणून मी पावसात चालतो माझे दुःख मी पावसासवे सांडतो', असं चार्ली लिहितो..
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)