शिक्षण मातृभाषेतच 'का' असायला हवं.?

आपली मातृभाषा मराठी. असं म्हणतात, तिची उत्पत्ती ९०५ मध्ये झालेली आहे. म्हणजे ही मायबोली कित्ती जुनी आहे. लहान मुल जेव्हा बोलायला शिकतं, तेव्हा त्याचा पहिला शब्द मातृभाषेतच असतो. हे त्या बाळाला कुणी शिकवलेलं नसतं, पण कानावर पडणारे शब्द, घरातील लोक बोलताना ऐकून ते बाळ आपला स्वतःचा असा शब्दकोश तयार करत असते.


विचार करताना मुलांचा भाषेशी सबंध आहे. मातृभाषेला जैविक भाषा, स्वभाषाही म्हणतात. कारण ती भाषा फक्त आईचीच न रहाता स्वतःचीही होऊन जाते. इंग्रजी शाळेत लहान मुल जात तेव्हा ते आधीचं नव्या वातावरणाने बावरलेलं असतं. त्यात मिस काय बोलते, ह्याचे आकलन होत नसल्याने मुल बावरुन शिक्षकांच्या तोंडाकडे पहात बसतात.

मिस त्याला 'रेन रेन'चे हावभाव शिकवते, तेव्हा त्याला रेन हा शब्द शिकावा लागतो. पण येरे येरे पावसामध्ये त्याला ये माहित आहे आणि पाऊसही माहित आहे. यात समजणाऱ्या भाषेमुळे शिक्षक आणि मुले यांच्यात ताणविरहित नाते तयार होते. आणि मंडळी ताणविरहित नाते असेल तर संवाद चांगला होतो ना..!

शाळेत मिळणाऱ्या माहितीचे ज्ञानात रुपांतर करण्याची प्रक्रिया प्रत्येक मुलाची वेगळीवेगळी.. ही प्रक्रिया जर मातृभाषेतून झाली तर मुलांना त्याच ज्ञानात रुपांतर सहज करता येईल. कारण पाण्याचे चक्र त्याला शिकवायचे असेल तर पुन्हा वर सांगितल्याप्रमाणे मुलाला 'वॉटर' हा शब्द शिकवावा लागेल. पण पाणी असं सांगितल्यावर तो सहज आणि पटकन शिकतात.

मुलं सहजभाषेत शिकवलं की पटकन शिकतात, हे मी कश्वीला शिकवताना खूप वेळा अनुभवलं आहे. भोवतालच्या परिसराची भाषा हे मुलांचे शिक्षणच आहे. मुलांच्या समजेची व्याप्ती विस्तारायची असेल तर त्याला शिक्षणाची नक्कीच गरज आहे. पण हे शिक्षण त्यांच्या अंर्तमनात आधी पोहचायला हवं, म्हणून भाषा त्यांच्या आकलनातील हवी.

मुलाला त्याचा स्वतःचा असा विचार करता यायला हवा. त्या विचारातून त्याच्या समजेचा आवाका वाढणार आहे. मुलांमध्ये निष्ट-अनिष्ट, वेगवेगळ्या अनुभवांची, जगण्यावर अपार प्रेम करण्याची क्षमता, आयुष्याबरोबर झुंजण्याचं बळं, आत्मविश्वास, आस्था असावी. हे सारे गुण घेऊन आपलं मुल परिपूर्ण असावं, हे प्रत्येक पालकाला वाटत असते.

त्यासाठी त्याची समज वाढायला हवी. मुल कानावर पडणाऱ्या सहज भाषेतून शिकलं तर अत्यंत सक्षमतेने शिकेल यात शंका नाहीच. कारण शिक्षणाच्या प्राथमिक टप्यावर मेंदू विकासात मुलांना शिकवताना किंवा खेळताना हात, डोळे, हालचाली यांच्यातील समन्वयास महत्त्व द्यायला हवे हे निश्चित. त्यासाठीच काही मुद्दे महत्त्वाचे.

शिक्षण गुणवत्तापूर्ण असायला हवं. सतत मळलेल्या वाटेने जाणाऱ्या शिक्षण पध्दतीत बदल करायला हवेत. प्रत्येक शिक्षकाने वय वर्ष तीन ते पाच वर्ष वयाच्या मुलांना शिकविण्याचे रितसर शिक्षण घेतले पाहिजे. त्यांचे भावविश्व जाणून घेतले पाहिजे. इंग्रजी न येण चुकीचं, हा एक न्युनगंड आहे. तो डोक्यातून काढायला हवा.

इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार वाचायला, लिहायला मिळतं का ? भाषा केवळ संज्ञापनाची संरचना नाही, तर आपल्या अस्तित्वाशी, सांस्कृतिकतेशी जुळलेली नाळ आहे. अर्थात प्रत्येक भाषा परिपूर्ण आहेच, पण ज्ञानसाधनेसाठी मातृभाषाच योग्य आहे. माणूस गंभीर प्रसंगात, सुखदुःखात भावना व्यक्त करताना मातृभाषाच आठवते हेच खरं.

इंग्रजांना आपल्यावर राज्य करायचे होते, म्हणून त्यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा आधार घेतला. कारण ती त्यांची मातृभाषा होती. आणि इथे कारभार करण्यासाठी इंग्रजी भाषा स्थानिक लोकांना येण आवश्यक होतं. सोविएत रशियातील संघराज्य अनेक वर्ष एकसंघ राहून महाशक्ती बनू शकला, यात त्यांनी देशभर लागू केलेला रशियन भाषेचा जलुमी आग्रह कारणीभूत होता.

ज्येत्यांनी जितांवर आपली संस्कृती लादण्याचा पहिल्यापासून प्रघात आहे. कारण भाषा हे समाजाला ताब्यात ठेवण्याचे व एकसंध ठेवण्याचे प्रभावी माध्यम. आता इंग्रजी ही संपर्काची भाषा आहे हे मान्य आहे, पण संपर्क भाषा आणि ज्ञानभाषा यात फरक आहेच ना.. माणूस वेदना, सुखदुःख मातृभाषेतच व्यक्त करतो हेच खरं..

हल्ली भाषाशिक्षणाच्या कितीतरी सुलभ पध्दती विकसित झाल्या आहेत. मराठी शाळेमध्ये इंग्रजी शिकवता येईलच ना. आता शिक्षणतज्ञांना मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व लक्षात आले आहे. म्हणून शैक्षणिक धोरण लागू झालेय, पण याची सक्ती केली जाणार नाही. खरंतर यामुळे लहान मुलांना मातृभाषा यांची सांगड घालून मुलांना शिकवायची संधी आहे.

अर्थात आपल्या देशात भाषास्वातंत्र्य हे अभिव्यक्तिस्वातंत्र्यामध्ये मोडते. त्यामुळे हे सर्वस्वी पालकांवर अवलंबून आहे. शेवटी एवढंच वाटतं.. शिक्षणपध्दतीत बदल होणे गरजेचं आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्रोत्साहन देऊन फाडाफाड इंग्रजी बोलणारा 'मात्र विचारशक्ती पुरेशा प्रमाणात विकसित न झालेला नोकरवर्ग तयार करत आहोत. याचं परीक्षण होण मात्र गरजेचं.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कायदेतज्ञ असिम सरोदे म्हणतात, 'महाराष्ट्रात असे मराठी वकील आहेत त्यांना सर्वोच्च न्यायालयात मराठी भाषेतून वकीली करायची संधी मिळाली तर मराठी वकील सर्वोच्च न्यायालयातही आपली बाजू उत्तम मांडू शकतील.' म्हणून मातृभाषा ती मातृभाषाचं..!!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
(लेखिका 'सखीसंपदा'च्या संपादक आहेत)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !