भोवरा, गोट्या लिंगोरच्या,
सुर-पारंब्या, विटी दांडू,
आट्या पाट्या, पतंग, काटा-काटी
बॅट बॉल...
हे सारं खेळण्यात आमची पिढी बालपण जगली..
खरंच भाग्यवान आम्ही...
खेळण्यातले माचिसचे टिक्के,
पाकिटे, बिल्ले जिंकायची मजा होती.
जिंकल्यावर त्याचे गठ्ठे दाखवण्याची मस्तीही काही और होती... अंबानीपेक्षाही श्रीमंत असल्याचा तो दिखावा होता...
बालपणीची ही श्रीमंती आता कुठे दिसत नाही. विरुन गेलेला आनंद पुन्हा पाहायला मिळत नाही.. पोस्टमन घरी पत्र घेऊन यायचा.. माहेराहून आलेलं पत्र आई पाणावलेल्या डोळ्यांनी खूपदा वाचायची.. पोस्टमन काकांचा हक्काचा चहा असायचा.
कॉलनीशी त्यांचं जिव्हाळ्याचं नात होतं..
ते काका आता फारसे दिसत नाहीत.
शाळा सुरु झाल्यावर बाबा सोबत वह्या पुस्तके आणण्याची नवलाई असायची. नवीन पुस्तकांना कव्हर लावण्याचाही सोहळा होता.
वाढदिवशी वर्गात चॉकलेट वाटताना सगळे हॅपी बर्थ डे करायचे, खूप कौतुक असायचं. ज्याची बॅट त्याची बॅटिंग.. असा तो जमाना होता. खुप वेळ तो नॉट आऊट म्हणून खेळत राहायचा. मग कशी बशी बॅट हाती यायची..
रात्री घराबाहेरील ओसरीवर सगळे झोपायचो.. कॉलनीतील मैदान भरून जायचं... हे चित्र आता पहायला मिळत नाही, असं झोपताना कोणी दिसत नाही. टीव्ही कोणा एकाच्या घरी असायचा, दाटीवाटीने पिक्चर, मॅच बघायची मजा होती. ती एकट्याने टीव्ही पाहताना आता येतं नाही..!
परीक्षेत पास झाल्यावर शेजाऱ्यांना पेढे देताना खुप अप्रुप वाटायचं. वाढदिवशी मित्र रेपरमधे गिफ्ट देतं मस्त शेक हेंड करायचे. तो आनंद व्हॉट्स ॲपमधील फुलांचा गुच्छ आता देणार नाही.
संक्रातीच्या दिवशी मित्रांसोबत घरोघरी तिळगुळ घेताना धमाल होती. ही धमाल पाहायला मिळतं नाही. कट्टी.. तो अबोला... नंतर पुन्हा सो... दोन बोटांच्या जुळण्यात दोस्ती पुन्हा घट्ट व्हायची..
हातातल्या काठीने जुने टायर दिवसभर पळवायचो.. कागदाचं विमान उंच उडवायचो. तो आनंद, वाजणारी टाळी आता दिसत नाही.. निष्पाप मनाने घेतलेली कट्टी, सो चे दिवस आता केंव्हाच संपले..
भावना, ओलावा, आसक्तीही आता दुर्मिळ झाली. भौतिक सुखाला आता किंमत आहे. पैश्यापुढे नाती तुटली, माणुसकीही असहाय झाली. जगण्याच्या प्रवासात.. आठवणींचा तळ शोधताना.. बालपण रम्य असतं. खरच, ते धन्य असतं..
- जयंत येलुलकर (अहमदनगर)