अबब ! महिला सक्षमीकरणासाठी 'या' महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद

प्रातिनिधिक स्वरुपात २५ महिलांना अर्थसहाय्य लाभार्थी प्रमाणपत्र प्रदान

मुंबई - आजच्या काळात महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमुळे  महिलांना शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप मशिन आदी संयंत्र सामग्रीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याने महिला आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि सक्षम होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


चुनाभट्टी येथील सोमैय्या मैदान येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य लाभ वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, सर्वश्री आमदार आशिष शेलार, प्रसाद लाड, यामिनी जाधव, मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, श्रावण हार्डिकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देण्याबरोबरच त्यांच्या प्रयत्नांना, प्रगतीला, कष्टाला बळ देण्याचे काम करण्यात येत आहे. जवळपास २७ हजारांहून अधिक पात्र महिलांना शिवणयंत्र, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्र दिले जाणार आहेत. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम राज्य सरकार, मनपा करीत आहे.

मनपाच्या जेंडर बजेटमध्ये १० ते १५ कोटी रुपये तरतूद होती. यामध्ये साहित्य वाटप, महिलांना सक्षम, पायावर उभे करण्यासाठी २५० कोटी रूपयांची बजेटमध्ये तरतूद केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत २७ हजारांहून अधिक महिलांना शिलाई, घरघंटी आणि मसाला कांडप आदी संयंत्र सामग्रीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. 

त्यामुळे २७ हजार महिला सक्षम होण्याबरोबरच २७ हजार कुटुंबे सशक्त होणार आहेत. आणखी २५  लाख महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मान्यवरांच्या हस्ते आज प्रातिनिधिक स्वरुपात २५ महिलांना अर्थसहाय्य लाभार्थी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !