आज आषाढातील पहिला दिवस. हा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदास म्हणजे साहित्यिकांचा शिरोमणी. कालिदासांनी संस्कृतमध्ये मेघदूतम, ऋतुसंहारम, अभिज्ञान शांकुतलम, रघुवंशम, कुमारसंभवम, मालविकाग्निमित्रम, विक्रमोर्वशीय, ऋतुसंहार अशा एकसे एक सरस कलाकृती दिल्या.
कालिदासजी उत्कृष्ट नाटककारच नव्हते तर कवी, चित्रकार, समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक, मनुष्यस्वभावांचे मर्म जाणणारे मनोविश्लेषकही होते. कालिदास दिनाच्या निमित्ताने त्यांच्या या अप्रतिम काव्यांवर कार्यक्रम साजरे केले जातात...
कालिदासांबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. लोककथाचं आहे असे म्हणतात... कथा मोठी रंजक आहे. विद्योत्तमा नावाची राजकुमारी जो तिला शास्त्रार्थामध्ये हरवेल त्याच्याशी लग्न करणार, असे म्हणते.
राज्यातील सर्व विद्वानांना ती ती हरवते. तर तिचा सूड उगवण्यासाठी तिचा राज्यातील अत्यंत मुर्ख असलेल्या व्यक्तिशी लग्न करुन दिले जाते. ती राजकन्या त्याचा अपमान करते अन विचारते, "अस्ति कश्र्चित् वाग् विशेष?" अर्थात - आपल्या वाणीमध्ये काय विशेष ?
यावर तो उत्तर न देता कालीमातेच्या मंदिरात भक्ती आणि अभ्यास करतो आणि स्वतःला कालिदास म्हणवून घेऊ लागला. तिने विचारलेल्या अस्ति कश्र्चित् वाग् विशेष या शब्दांनी सुरु होणारी तीन काव्ये रचली. ती काव्ये अशी -
अस्त्युत्तरस्याम् दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः (ही आहे कुमारसंभवाची सुरवात).
कश्र्चित् कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमतः ! (ही कुमार संभवाची सुरवात).
वागर्थाविव संपृक्तौवागर्थप्रतिप्रत्तये !जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ.. (रघुवंशाची सुरवात.) न बोलता कालिदासांनी आपल्या विद्वतेने विद्योत्तमेला हरवून टाकले..
प्रियतमेच्या विरहाची विकलता, आर्तता, व्याकूळता सांगणारे 'मेघदूत' हे खंडकाव्य आजही प्रत्येक कविमनाला भुरळ घालणारे आहे. यातील नायक एक कर्तव्यभ्रष्ट्र यक्ष आहे. अलकानगरीच्या नरेशाने यक्षाला कर्तव्यभ्रष्टतेसाठी एक वर्ष दूर रामगिरी पर्वतावर एकांतवासाची शिक्षा दिली आहे.
त्याला आपल्या प्रेयसीपासून दूर राहावे लागल्याने यक्ष व्याकूळ वेडापिसा झाला. कृश झाला होता तेव्हा त्याला आषाढातला हा मेघ दिसतो. आपल्या प्रियतमेला संदेश पाठविण्यासाठी त्यानं निवडलं या मेघाला.. असं म्हणतात पूर्वी पक्षी, वायू, मेघ यांच्यामार्फत संदेश पोहचवला जात असे.
'मेघदूत' हे अशाच संदेशांच्या प्रतिकाचं खंडकाव्य आहे. कालिदासांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेले हे संदेशकाव्य म्हणजे विव्हल मनातले भावतरंग आणि निसर्गागान यांचा सुंदर मिलाफ आहे.
मेघाला दूत म्हणून पाठवताना तो त्याला मेघाला वाटेवरुन जाताना दिसणारे निसर्गसौंदर्य कसे पहावे, हेही विस्तारपूर्वक सांगतो. ही वर्णने इतकी सुंदर आहेत ना.. आपल्यालाही कालिदास मानवी स्वभाव, सुख दुःख दाखवत रहातो. भौगोलिक वर्णन अतिशय सुंदर केले.
भाषा सौंदर्य, आशयगर्भ, लालित्य, याच्या प्रेमात पडून कित्येक दिग्गजांकडून याचे भाषांतर झालेले आहेत. कालीदासाने मेघदूतात वर्णन केलेला नागपूरपासून हिमालयापर्यंतच्या हवाई मार्गाचे प्रत्यक्ष निरीक्षण पुण्याचे डॉ. सुरेश विश्वनाथ भावे यांनी केले. कारण कालिदास हा भावेचा अत्यंत आवडता कवी.
ते म्हणतात जर त्या काळात आकाशात उडण्याची कला अस्तित्वात नव्हती तर कालिदासाने एवढे अचूक वर्णन कसे केले असेल. भावेंचे स्वतःच्या मालकीचे विमान होते. त्यांनी या मार्गाने जाऊन हा कालिदासांचा कल्पनाविलास नाही तर सत्य आहे हे सिध्द केले. डॉ. भावेंचे हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे.
'आषाढातील पहिल्याच दिवशी' या महाकवींनी मेघालाच दूत बनवून प्रियतमेला सांगावा धाडला म्हणूनच हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा होतो. अभिजात शांकुतलम या खंडकाव्यावर किती कथा, चित्रपट, काव्य लिहले गेले.. कण्व आणि शकुंतलेच्या पितापुत्री या नात्याचा काल मला आठव आला.
त्यांच्या साऱ्या कलाकृतींचे कितीतरी भाषेत अनुवाद करण्यात आले आहेत. कुमारसंभव हे खंडकाव्य अतिशय बोल्ड काव्य या प्रकारात मोडता येईल. या साऱ्या अद्वितीय कलाकृती आहेत. जगातील एकमेव अतिउत्तम कवी अशी कालिदासांची गणना आहे.
नाट्य भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम, हे पुणे येथील बालगंधर्व मंदिरातील वचन कालिदासांचेच आहे. आज या महान सारस्वताचे स्मरणं करणे आपले कर्तव्यच आहे. या निमित्ताने यांचे साहित्य नव्या पिढीपर्यंत थोडे तरी पोहचले जावे...
अर्थात शांताबाईंनी मेघदूताचे अतिशय सुरेख भाषांतर केले आहे. मिळाला तर जरुर वाचा.. आषाढ शुध्द प्रतिप्रदा अर्थात महाकवी कालिदासदिनाच्या निमित्ताने कालिदासांना विनम्र वंदन.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)