..कारण की, 'वेळ' कधीच कुणासाठी थांबत नाही


वेळ. वक्तशीर असणं, वेळ पाळणं, दिलेला शब्द पुर्ण करण्यासाठी श्रम घेऊन तो शब्द पुरा करुन समोरच्याला समाधान देणं.. हे मी बाबांकडून शिकले.

शब्दाचे आणि वेळेचे जे पक्के असतात त्यांना त्रास होईल पण होणाऱ्या समाधानाचे मोल कशातही होऊ शकत नाही..! 'वेळ' हा शब्द कसा आहे ना..! 'वेळ' सर्वांवर येते. ती संकटातही येते आणि आनंदातही येते.

वेळ सर्वांसाठी असते, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. कागज के फूल मधले ते गाणं, 'वक्तने किया क्या हसी सितम, हम रहे न हम, तुम रहे न तुम..' हे कुठल्याही नात्यात लागू पडतं बरं का मंडळी..!

कुठलीही व्यक्ती माझी आहे, माझ्या फारच जवळची आहे. तिचे अन माझे सातजन्माचे ऋणानुबंध आहेत, अशा वल्गना आपण करत असतो. पण एक वेळ अशी येते काही ना काही कारणाने आपण त्या व्यक्तीपासून दूर जातो.

कारण निर्मिकाने कुणी, कुणाच्या आयुष्यात किती वेळ, किती काळ रहायचं हे ठरवतं असते. आपल्या ऋणानुबंधाची वेळ संपली की आपण आपोआपच दूर होतो. मग एकमेकांवर काहीजण आरोपांचा पाऊस पाडतात, काही हृदयस्थ काळाच्या पडद्याआड नाहीसे होतात.

आपण त्या दुष्ट वेळेला दुषणं देत रहातो.. पण हेच खरं असत की वेळ सर्वांवर येत असतेच..! लोक आपल्यावर टीका करतात, कोणी मत्सर करतात. तेव्हा शांत रहायचं, कारण वेळ साऱ्यांनाच उत्तर देत असते. कारण वेळच आहे ती, असतेच सतत बदलण्यासाठी.

थांबतात ते क्षण असतात. कधी मधुर, कधी कटु. त्यांनाच आपण आठवणी म्हणतो. अशी ही वेळ.. जी आपल्या हातातून पाऱ्यासारखी सुळकन निसटून जाते. आयुष्यात वेळेवर जागे नाही झालो तर पश्चात्ताप करायला लागतो. कारण वेळ कुणासाठीच थांबत नाही.

कभी मिल जाए वो कारीगर
दोस्तो, तो मिलाना जरुर
भई, जिसने घडी़ बनाई होगी
शायद उसे वक्त रोकना भी आता ।

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूरकर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !