आपल्या सणांचा पाया सहिष्णुता आणि कृतज्ञताभाव यावर आधारलेला आहे. पूर्वजांनी मोठ्या कल्पकतेने आपल्या सर्व सणांची रचना केली आहे. श्रावणात चहुकडे हिरवळ दाटलेली असते. चहुकडे चैतन्याचे वारे असतात.
रक्षाबंधन हा सण म्हणजे पावसाळा संपण्याचा संकेत म्हणून साजरा करत असत. आता पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ऋतुमानाची साखळी बिघडली आहे.
समुद्र म्हणजे कोळीबांधवांचा मित्र. तोच त्यांच्या उपजिविकेचे साधन म्हणून कोळी बांधव ही नारळी पोर्णिमा मोठ्या उत्साहाने नाचत, वाजत.. गाजत साजरी करतात. समुद्राची पूजा करतात. नारळ अर्पण करतात. प्रार्थना करतात,"पर्जन्य वर्षावाने उधाण आलेल्या दर्यादेवा, शांत हो आणि लाटा सौम्य होऊन आमचे रक्षण होऊ दे."
नारळी पोर्णिमेनंतर समुद्र शांत होतो. या दिवशी ते मासेमारी करत नाहीत. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा सण साजरा होतो. याच दिवशी रक्षाबंधन ही साजरे होते
रक्षाबंधन विषयी खूप कथा सांगतात.. शिशुपाल वधाच्या वेळी श्रीकृष्णांच्या एका बोटाला जखम झाली होती. रक्त वहात होते ते थांबविण्यासाठी द्रौपदीने आपला पदर फाडून श्रीकृष्णांच्या बोटाला पट्टी बांधली... यात परस्परांच्या रक्षणाची आणि सहकार्याची भावना दिसते.
सिकंदर नावाचा राजा भारतातील राज्ये जिंकत जिंकत झेलम नदीपर्यंत आला. तिथे सावित्री नावाची स्त्री झेलम नदीची पूजा करुन तिला राखी अर्पण करत होती. तिने सिकंदराला सांगितले मला भाऊ नाही म्हणून मी नदीला माझ्या संरक्षणार्थ राखी म्हणजे रक्षेचे बंधन बांधत आहे. म्हणूनच सिकंदराने सावित्रीला बहिण मानले.
कालांतराने पोरस राजाच्या पराभवानंतर सावित्रीच्या विनंतीवरुन सिकंदराने पोरस राजाला बंधमुक्त करुन राज्यही परत दिले. कोण म्हणते सिकंदराच्या पत्नीने पोरसला भाऊ मानून राखी बांधली होती म्हणून पोरसाने सिकंदरावर शस्त्र उचलले नाही.
इंद्र एकदा युध्दावर जाताना इंद्राणीने इंद्राला रक्षासुत्र म्हणून हे बंधन बांधले होते. चितोडचा राजा राणासंग ने चितोडचे रक्षण नेटाने केले. पण त्याच्या मृत्यूनंतर राजासंगची पत्नी राणी कर्मावतीने हिने दिल्लीशहा हुमायुनला राखी पाठवून दिली. हुमायुनने या राखीचा आदर करत चितोडवर बहादूरशहाचे आक्रमण होणार नाही, असे आश्वासन दिले.
या कथा आख्यायिका वाचल्यानंतर असे वाटते की परस्पर स्नेह... स्त्रीविषयक आदर वृध्दिंगत करण्याचा सण आहे. काळानुसार या सणांमध्ये बदल व्हावेत... स्त्रीकडे पहाण्याची समाजाची दृष्टी बदलायला हवी.. आता पुरुषच संरक्षक आहे असं नाही.
आईबाबांच्या माघारी लहान भावंडावर सावली धरणारी, त्यांना जगायला लायक बनवणारी बहिण ही कुंटूबाची संरक्षकच आहे ना...! तिचा सन्मान करणं हाच आजच्या रक्षाबंधनाचा अर्थ आहे.. फक्त आपण तो जाणून घ्यायला हवा.
नजर बदलली की आपोआपच आपली मते बदलतील... समतेच्या या युगात संरक्षणार्थ एकमेकांच्या साथीन उभं राहणं हेच रक्षाबंधन असेल. होय ना..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)