भेदाच्या पलिकडे जाऊन जनमानसावर घातलंय गारूड
ॲड. उमेश अनपट (नाशिक) - 'मनोज जरांगे पाटील' या नावाने महाराष्ट्रासह अवघ्या देशात गारूड घातलंय. राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या मनामनात या पठ्ठयाच्या चिवट संघर्षाने घर केलंय. समाजासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या या सच्या, प्रामाणिक कार्यकर्त्याने अगदी जात-पात, धर्म, पक्ष असले सर्व भेद बाजूला सारून सर्वांच्या मनाला अक्षरशः भुरळ घातलीय.
त्यातूनच गल्ली पासुन ते दिल्लीपर्यंतचे राजकारण हादरवून टाकणाऱ्या या लढवय्याची आजच्या अविश्वासार्ह परिस्थितीत 'एक सच्चा कार्यकर्ता ते विश्वासार्ह नेतृत्व' अशी घट्ट ओळख निर्माण झालीय.
सच्चा कार्यकर्ता : मूळचे बीडमधील मातोरी हे मनोज जरांगे पाटील यांचे मूळ गाव. मात्र, काही वर्षांपासुन जालन्याच्या अंबडमधील अंकुशनगर येथे ते स्थायिक झाले आहेत. घरची परिस्थिती अतिशय बेताची. पत्नी, चार मुले, तीन भाऊ आणि आई-वडील असे त्यांचे कुटुंब. कुटुंबाच्या या जबाबदारीतही त्यांनी समाजसेवेची कास धरली ती सोडलीच नाही.
मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देईना. समाजाच्या प्रश्नासाठी अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिले. मराठा समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपली पूर्ण हयात घालणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून जरांगे पाटील यांची ओळख निर्माण झालीय.
विश्वासार्ह नेतृत्व : राजकारण, समाजकारणात काम करणाऱ्या व्यक्तींकडे आज संशयाने पाहिले जातेय. या क्षेत्रातील बहुतेक मंडळी सामाजिक मुखवटे घालून स्वार्थीपणे काम करतात, अशी पक्की भावना सर्वसामान्य लोकांची निर्माण झालीय.
देशात, राज्यात अलिकडील काळात घडलेल्या काही घटनांनी तर राजकारणी लोक सत्तेसाठी प्रसंगी कुणाचाही घात करुन, अगदी कुठल्याही स्तराला जावू शकतात, हे अधोरेखितच केलंय. मात्र, या निराशाजनक, अविश्वासार्ह वातावरणात मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने एक विश्वासार्ह, दिलासादायक चेहरा समाजापुढे आलाय.
'बोले तैसा चाले', या उक्तीप्रमाणे सत्याची कास धरत, दिलेल्या वचनाला जागणारा, प्रसंगी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारं व्यक्तिमत्व म्हणून मनोज जरांगे पाटील पुढे आलेत. जात - पात, संघटना, पक्ष असे सर्व स्तरातून त्यांच्या विश्वासार्हतेबाबत चर्चा होतेय, हे विशेष. हा आश्वासक, सच्चा, एकवचनी चेहरा सर्वांनाच हवाहवासा वाटतोय.
संघर्षाची वाट : सुरूवातीला काँग्रेस पक्षात काम करून पुढे काँग्रेसशी फारकत घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी शिवबा संघटनेची स्थापन केली. या माध्यमातून अतिशय आक्रमकपणे त्यांनी सामाजिक कार्यास सुरूवात केली.
मराठा आरक्षणासाठी गेल्या १० ते १५ वर्षापासून मनोज जरांगे पाटील मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून संघर्षाची बिकट वाट चालत आहेत. २०११ पासून अथकपणे ही चळवळ त्यांनी सक्रीय ठेवलीय. दरम्यान, २०१४ मध्ये त्यांच्या नेतृत्वातील औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चाने राज्याचे लक्ष वेधले गेले.
तेंव्हापासून जरांगे पाटील प्रकाशझोतात आले. २०२१ मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केले. शिवाय त्यावेळी सहा दिवस उपोषणही केले. याशिवाय मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना गोरीगंधारी येथे केलेल्या आंदोलनातून मदतही मिळवून दिली.
मराठा आरक्षणासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले, आमरण उपोषणे केली, रास्ता रोको केले. आतापर्यंत आरक्षणासाठी त्यांनी तब्बल ३५ हून अधिक मोर्चे, आंदोलने केली आहेत. या दीर्घ, अथक, खडतर प्रवासातून त्यांची संघर्षमयी वाटचाल दृष्टीस पडते.