पहाटेच जाग आली. सगळं घर झोपलेलं.. चहा घ्यायची तलब झाली. थोड उजाडल्यावर हिला विचारलं चहा घ्यायचा का... "हो" उत्तर आलं. वाफाळलेला चहा कपामधे भरताना..
या शांत वातावरणात क्षणभर विचार आला, हिला तर रोजचं हे काम करावं लागतं, अगदी चहापासून सारं काही...! कधी विचारलंही नाही मी कधी तिला, किती थकतेस गं तू रोज... हे सारं करताना.. तरी हसतमुख असतेस..
मी आपला रोज चहा कर, पाणी दे, जेवण वाढ... टॉवेल दे, शर्ट आण.. अशी कामं रोजचं ऑर्डरच्या थाटात सांगणारा..! पण हिच्या चेहऱ्यावरचा थकवा दिसलाच नाही मला कधी.
किती वर्ष झालीत आता या संसाराला.. एकानं पसरवत बसायचं, दुसऱ्यानं आवरायचं...! तिचं समर्पण कधी लक्षातचं आलं नाही आपल्याला. आज एकट्यानं चहा करताना जाणवलं, हिच्याशिवाय सगळं अधुरं आहे.
थोड्याच वेळात ही नव्या उत्साहानं संसार नावाच्या प्रवासाला जुंपनार आहे. मनात आलेले हे विचार मी देखील विसरणार आहे. वाफाळलेल्या चहाचा कप भरला होता. तिला चहा देतानाचा आनंद वेगळाच होता...
- जयंत येलुलकर (अहमदनगर)