येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
या जगात दु:खी कोण आहे..? तर, ज्याच्या इतरांकडून काही अपेक्षा आहेत, असा माणूस.! कुणाचं मन कधी बदलेल सांगता येत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचं मन समजेलच असे नाही. आणि समजलं तर त्याची दखल घेणे महत्वाचे वाटेलच असेही नाही.
आपल्या आनंदासाठी इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः आपल्या आनंदाचे कारण बनण्यात फार समाधान आहे. गोष्टी रोजच्या सवयीपेक्षा वेगळ्या घडल्या तर दुःख होतं. म्हणुन दुःख देणाऱ्या सवयी मोडण्यात शहाणपण आहे.
आपला वेळ निरर्थक गोष्टींचा विचार करण्यात वाया घालवण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या मनाला समाधान देतात, ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतील, असे विचार आपण मनाच्या ठायी बाळगले पाहिजे. वेळ चांगली असो किंवा वाईट, ती निघून जाणार आहे. संयमाने पुढची वेळ आपण जिंकली पाहिजे.
सहजासहजी काहीच साध्य होत नसते. निरंतर प्रयत्न अशक्य गोष्टी साध्य करण्याची ताकद ठेवतात. आपल्या मनाला अविचारांचा गंज लागणार नाही, यासाठी मनाला जपले पाहिजे. आहे त्या क्षणाला 'जागणं' आणि 'जगणं' या इतकं महत्वाचं दुसरं काहीच नसावं, असं मला वाटतं.
अपेक्षांचं ओझ घेऊन फिरू नका. नसेल कुणी तुमचे पण तुम्ही सर्वांचे व्हा. तुमच्यासाठी तुम्ही उभे रहा. हे जीवन इतकं सुंदर आहे की खड्ड्या-खुड्ड्यांमध्ये अडकून पडू नका.
- शुभांगी माने (अहमदनगर)