आहे तरी कोण मी...?
जग संसाराच्या रहाट गाडग्यातला कोणीतरी,
हो कोणीतरीच ना...
जन्मदात्यांचा पुत्र
ते होतें, त्यांनी सांभाळलं, जपलं,
पंख फुटले तेव्हा आकाशात विहार करायलाही त्यांनीच शिकवलं...
मी उडालो तसाच उंच
विसरलो मातीला वाटलं,
उंच गेल्यावर दिसेल तरी स्वर्ग...
भुई माझी आई
डोळ्यातील आसवांना मोकळं करीत,
वाट पहात थांबली होती..
पंख फुटलेला मी
मायेची आई
अन्
माझी आस असलेला बाप...
त्यांनी वाढवलं, मोठं केलं
आज ती ही नाहीत.
बोट धरून चालायला शिकवलं...
धागा पकडून ठेवला होताच ना त्यांनी शेवटपर्यंत
म्हणून तर रस्ता सरळ दिसला...
कितीतरी वर्ष झाली ती सोडून गेलीत
एकटं सोडून..
गर्दीचं जग,
ज्याला त्याला काही हवं...
त्यांनी काय मागितलं होतं
काहीच नाही,
फक्त
माझा आनंद पाहायचा होता,
डोळे भरून...!
आज तुम्ही नाहीत,
गर्दी फिरतेय भोवती
तसा मी ही फिरतोय वेगात...
चेहरे दिसेनासे झालेत
कुणी रडतंय, विव्हळतय
कोणाचं राक्षसी हसणं
कुणी ओढतय जोरात
भीतीनं हैराण मी
तोल गेला
धागा सुटला,
तुम्ही पकडून ठेवलेला..
आकाशातला विहार
आदळला जमिनीवर
आयुष्याच्या खेळात
पोरकेपण जाणवलं
माझं एकटेपण,
चेहरा नसलेलं...!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)