चित्रपटात जसे नायक, नायिका, खलनायक अतिशय महत्वाचे असतात. त्याचप्रमाणे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी विनोदी नटही महत्वाचा असतो. चित्रपटाचा एकूणच इतिहास खंगाळून पाहिला तर आपल्याला विनोदी नटांची खूप मोठी मांदियाळी दिसून येईल. ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला निर्विवाद अन खळखळून हसवलं आहे.
विनोदी नट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जॉनी वॉकर, मेहमूद, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, जॉनी लिव्हर, राजपाल यादव ही नावे येतात, पण भारतात विनोदाला चित्रपटात महत्वाचे स्थान मिळवून देण्यात अन विनोदी अभिनेत्यांना प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळू शकते, ही जाणीव निर्माण करणारे पहिले विनोदी नट म्हणजे नूर मोहम्मद चार्ली.
नूर मोहम्मद यांचा जन्म गुजरातमधील रानावाव येथे १९११ साली झाला. लहानपणापासूनच त्यांना सिनेमाची भारी हौस होती. त्याकारणाने ते सिनेमा पाहण्याची संधी दवडत नसायचे. संधी मिळेल तेव्हा ते सिनेमा पहायचे.
शिक्षणात उत्साह नसल्यामुळे कमी वयातच अर्थाजनासाठी त्यांनी वेगवेगळी कामे केली. वयाच्या सोळाव्या वर्षी शिक्षण सोडलेला हा मुलगा आपलं सिनेमात जाण्याचं स्वप्न उराशी बाळगून इंपिरीयल कंपनीत 'क्लॅपर बॉय' म्हणून काम करू लागला. १९२८ सालापासून त्यांनी मूक चित्रपटातून अभिनय करण्यास सुरवात केली. त्यांना खऱ्या अर्थाने एल्फिन फिल्म कंपनीच्या ‘द इंडियन चार्ली’ या चित्रपटापासून प्रसिद्धी मिळाली.
भारतीय चित्रपटात राज कपूर यांच्या चित्रपटात किंवा त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमध्ये प्रथम 'चार्ली चॅपलिन'ची छटा दिसून येते, असा साधारणतः भारतीय प्रेक्षकांचा समज आहे, पण तसे नसून त्यागोदर नूर मोहम्मद यांनी चार्लीची व्यक्तिरेखा, त्याचा पडद्यावरील एकूण वावर इतका स्वतःमध्ये भिनवला की त्यांचे नूर मोहम्मद हे मुळचे नाव जाऊन सिनेमाच्या पडद्यावर चार्ली हेच नाव येऊ लागले.
नूर मोहम्मद चार्ली जाऊन इतके वर्ष झाले आहेत तरी त्यांच्या पुढच्या पिढ्याही चार्ली हे नाव आपल्या नावासमोर आडनावासारखे वापरत आहेत. बोलपटांचा जमाना सुरु झाल्यावर अनेक मुकपटाचे कलाकार बेरोजगार होऊ लागले, पण नूर मोहम्मद यांच्या ठायी असणाऱ्या कलागुणांमुळे त्यांची कारकीर्द उत्तरोत्तर बहरत गेली.
नूर मोहम्मद हे विनोदी नट असूनही चित्रपटात नायकाची भूमिका करणारे पहिले विनोदी नट होत. विनोदी नटाला ज्याप्रमाणे नायकाची भूमिका मिळत नव्हती त्याप्रमाणेच त्यांच्यावर गाणेही चित्रित केले जात नव्हते, नूर मोहम्मद हे पहिले विनोदी नट आहेत की ज्यांच्यावर गाण्याचे चित्रीकरण झाले आहे.
‘बॅरिस्टर वाईफ’ या चित्रपटात त्यांच्यावर भारतीय चित्रपटातील पहिली कव्वाली चित्रित करण्यात आली. नूर मोहम्मद त्यांच्या कालखंडात सगळ्यात जास्त मानधन घेणारे कलावंत होते. सुप्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस हिच्या ‘तकदीर’ या पदार्पणाच्या चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.
त्याचप्रमाणे जॉनी वाकर, मेहमूद हे नूर मोहम्मद चार्ली यांच्या कामाने प्रभावित होते. नूर मोहम्मद यांनी भारतात ‘जरीना’, ‘प्रेमी पागल’, ‘मोहब्बत की कसौटी’, ‘तुफान मेल’, ‘किमती आसू’, ‘रात की राणी’, ‘बॅरिस्टर की वाइफ’, ‘लहरी लैला’, ‘रंगीला राजा’, ‘संजोग’, ‘तकदीर’, ‘रौनक’, ‘बासरी’, ‘ठोकर’ यासारखे अनेक चित्रपट केले.
चित्रपट अभिनेता असण्याबरोबरच त्यांनी गायक म्हणूनही प्रसिद्धी मिळवली. त्यांची गायनाची विशिष्ट लकब ज्यातही त्यांचे 'चार्ली'पण डोकावते, त्यामुळे त्याकाळी असणाऱ्या इतर गायकांपेक्षा ते वेगळे वाटतात.
त्यांच्या गायनातूनही विनोद बरसत राहतो, हे त्यांचे ‘पलट तेरा ध्यान किधर है’, ‘पपीहा काहे मचाये शोर’, ‘उडते हुये पंछी’ ही गाणी ऐकली तरी आपल्या लक्षात येईल. ‘ढींढोरा’ हा एक चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केला आहे.
भारताची फाळणी झाल्यानंतर ते पाकिस्तानात गेले परंतु भारतात त्यांना जी प्रसिद्धी मिळाली ती पाकिस्तानात मिळाली नाही. तेथे त्यांनी उर्दू, पंजाबी, सिंधी चित्रपटात कामे केली, ज्यामध्ये ‘मुंदरी’, ‘अकेली’, ‘उमर मार्वी’, ‘परदेशी’, ‘सितारो की दुनिया’ आदी चित्रपट आहेत.
पण तिथे त्यांचा जम न बसल्यामुळे ते १९६० च्या दरम्यान परत भारतात आले आणि त्यांनी येथे काही चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांमध्ये ‘जमीन के तारे’, ‘जमाना बदल गया’, ‘अकेली मत जैयो’, ‘मेरा घर मेरे बच्चे’ हे चित्रपट केले.
पण भारतीय नागरिकत्व न मिळाल्यामुळे त्यांना परत पाकिस्तानात जावे लागले. तेथेच कराचीला सन १९८३ साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा मुलगा लतिफ चार्ली यांनी चालवला. लतिफ हे पाकिस्तानातील एक महत्वाचे चित्रपट आणि टेलीव्हिजन अभिनेता होते.
त्यांचा नातू डिनो अली हा पाकिस्तानचा आघाडीचा व्हीजे/आरजे आहे. त्याचबरोबर तो अभिनेता अन गायकही आहे. त्याने अमिताभ बच्चन, शाहरुख खान आदी मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. अशा प्रकारे तिसऱ्या पिढीतही नूर मोहम्मद चार्ली यांचा कलेचा वारसा जपलेला आहे.
- सचिन धोत्रे (दैठणे गुंजाळ, ता. पारनेर, अहमदनगर)