खुप मोठ्ठा ऐतिहासिक वारसा लाभलाय 'या' किल्ल्याला, चला वंदन करुया..


पंचशताब्दीचा वारसा लाभलेल्या आमच्या शहराशी आज गच्च गळाभेट. खुप मोठा ऐतिहासिक, धार्मिक वारसा लाभलाय आमच्या शहराला.. मग अभिमान वाटेलच ना आम्हाला...

(छायाचित्र : अनिल शाह)

सुंदर, नियोजनबध्द विकसित झालेलं शहर होत आमचं.. म्हणून तर निजामशहाने हे शहर आपल्या राजधानीच शहर म्हणून विकसित केलं होतं. इथल्या अनेक वास्तू साक्ष देत उभ्या आहेत त्या काळातील समृद्ध इतिहासाच्या व पराक्रमाच्या.

आमचा भुईकोट किल्ला.. जमिनीवरचा मजबूत, आदर्श किल्ला. हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी अगदी दिल्लीचा अकबर बादशाह देखील आसुसलेला होता. त्यानेही आपल्या मुलांमार्फत किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली होती.

आज जागतिक वारसा दिन आहे. म्हणून अभिमान वाटतो. किल्ल्याचे बुरुज ढासळू लागले तरी.. दुर्लक्षित बांधकाम खचू लागले तरीही.. अनेक समृध्द घटनांची साक्षीदार असलेली ही जाज्वल्य इतिहासाची वास्तू लवकरच भुईसपाट होणारं असली तरीही.

आज वारसा दिन आहे. किल्ला त्याच्यावर झालेल्या वर्षानुवर्षांच्या आघाताने, त्याला झालेल्या जखमांनी, वेदनेने विव्हळत असेल, रडत असेल.. निदान त्याचे डोळे तर पुसू या.. कारण आज जागतिक वारसा दिन आहे.

बुरुजावर मोर येतात, किल्ला त्याच्या व्यथा, वेदना त्यांना सांगत असतो, केविलवाण्या नजरेने.. काय करणार, आज जागतिक वारसा दिन आहे. शहराचं नाक असलेला किल्ला उद्या नामशेष झाला तरी, हसत हसत त्या ठिकाणी फुलं वाहायला येणारच आहोत आम्ही, जागतिक वारसा जपण्याची भाषणं करायला...!

- जयंत येलुलकर (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !