जीवनात जन्म, बुध्दत्व प्राप्ती, महानिर्वाण एकाच दिवशी प्राप्त होणारे महामानव म्हणजे तथागत गौतम बुध्द. आजचा दिवस तो म्हणजे बुध्दपोर्णिमा..!
इक्ष्वाकुंश वंशातील राजा शुध्दोधन आणि राणी मायावतीच्या पोटी राजकुमार सिध्दार्थाचा जन्म लुंबिनी येथे, इ.स.पूर्व 563 ला झाला. सिध्दार्थाच्या जन्मानंतर मायावतींचा मृत्यू झाला. मावशी महाप्रजापती गौतमी यांनी सिध्दार्थाचा सांभाळ केला. त्यांना युध्द आणि राजनितीचे शिक्षण झाले.
राजकन्या यशोधरेशी लग्नं झाले. राहुल नावाचा एक पुत्र झाला. पण विचारी सिध्दार्थाला सतत प्रश्न पडत असे. या जगात एवढे दुःख का आहे.? ते कसे कमी करता येईल.? या अस्वस्थतेमुळे सिध्दार्थांनी वयाच्या 29 व्या वर्षी राजपरिवाराचा त्याग केला.
भिक्षु आळारकलाम, उद्दक रामपुत्त यांच्याकडे साधना केली, समाधी साधना करायला शिकले. पण साधनेतून बाहेर आल्यावर पुन्हा दुःख आहेच. अनेक गुरु केले.. प्रत्येकाचे तत्वज्ञान त्यांनी ऐकले. पण त्यांना ते पटले नाही.
गया येथे सिध्दार्थ कठोर चिंतन करत बसले. साधना करताना सिध्दार्थांनी दान, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, क्षांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री व उपेक्षा या दहा पारमितांचा अभ्यास करुन विकास केला. आणि विकासाची, ज्ञानाची परमोच्च अवस्था गाठली.
त्यांना आत्मज्ञान झाले. तो दिवस होता वैशाखशुध्द पोर्णिमेचा. पिंपळ (बोधीवृक्ष-गया) वृक्षाखाली त्यांना जीवनाचा अर्थ कळला. दुःखांचे कारण कळले आणि दुःखातून बाहेर पडण्याचे मार्ग कळले. आणि पस्तीस वर्षांचे सिध्दार्थ 'तथागत गौतम बुध्द' झाले.
गौतम हे नाव त्यांनी आपला संभाळ केलेल्या मावशीच्या नावावरुन घेतले आहे.. मावशीने दिलेल्या ममतेविषयी ही कृतज्ञता..! इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी सामान्य जनांच्या 'मागधी' भाषेत प्रवचने केली. जवळजवळ पंचेचाळीस वर्ष बुध्दांनी जनतेला बोध केला.
वयाच्या ऐशींव्या वर्षी बुध्दांनी कुशीनगर येथे आपला देह ठेवला. त्यांची शिकवण- दुःखांचे ज्ञान होणे, अप्रिय गोष्टींची प्राप्ती किंवा प्रिय गोष्टींचा वियोग झाला की दुःख होते. दुःखाचे कारण ओळखणे- अशाश्वताला शाश्वत समजल्याने दुःख होते.
दुःखमुक्त होऊ शकतो हे कळणे- तृष्णेचा, हवे नकोपणाचा त्याग केल्याने दुःखमुक्त होऊ शकतो.. दुःखमुक्त होण्याचा मार्ग कळणे म्हणजे सम्यक (balanced) होणे. जीवनाचा आर्य अष्टांगी मार्ग बुध्दाने सांगितला आहे.
बुध्दांच्या पंधरा ग्रंथापैकी जातककथा हा अत्यंत लोकप्रिय ग्रंथ आहे. दुर्गाबाई भागवतांनी जातककथांचे अतिशय सुंदर अनुवादित सिध्दार्थ जातक ग्रंथ लिहला आहे. या कथा पंचतंत्राशी साम्य दाखवतात.
जातककथांचा नायक हमखास बोधीसत्व असतो. 'बोधीसत्व' म्हणजे बुध्दत्वाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असा.. पशू, पक्षी, जलचर या विविध योनीत त्याने जन्म घेतल्याच्या कथा आहेत. सांची, भारहूत, आंध्र प्रदेशातील अमरावती येथे बौध्द स्तुपांवर या जातककथांची शिल्पे कोरलेली दिसतात.
बुध्दांनी अहिंसेचे पालन करण्याचा उपदेश केला. बुध्द म्हणजेच करुणा.. एक संवाद. 'माणूस- मला आनंद हवाय', 'तथागत बुध्द-आधी या वाक्यातील मला.. (हा अंहकार), हवा..(ही इच्छा) हे शब्द पूसून टाक.. राहिल तो फक्त आनंद...!
जाता जाता.. मलाही आत्मप्रकाशित व्हायचं आहे. बस्स, त्यासाठी मला माझ्या चालण्याची दिशा बदलायची आहे. कारण.. तो तिथंच आहे. बोधीवृक्षाखाली. शेकडो वर्षांपासून.. मला तिथे फक्त पोहचायचं आहे..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)