आमिर खान पुन्हा अडचणीत, 'या' सिनेमावर बंदी घालण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी


पुणे - बॉलिवूडचा अभिनेता व निर्माता आमिर खान याच्या अडचणीत वाढ झाली आहे. हिंदु संत आणि संप्रदाय यांची बदनामी करणार्‍या ’महाराज’ चित्रपटावर तत्काळ बंदी घाला, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने येथे आंदोलन करत केंद्र सरकारकडे केली आहे. 

Credit : AFP

भारत ही साधू-संतांची भूमी आहे. संतांनी संपूर्ण विश्‍वामध्ये जाऊन भारतीय संस्कृती, धर्म, ज्ञान, कला, सभ्यता, सदाचार, तसेच भगवद्भक्ती शिकवून समाजाला आदर्श जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले आहे, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.

अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान, तसेच ‘यशराज फिल्म्स’ यांच्या ‘महाराज’ या चित्रपटातून साधूसंतांना दुराचारी, गुंड दाखवून त्यांची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटावर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने आंदोलनाच्या माध्यमातून केली.

दि. १२ जून या दिवशी दुपारी ४ वाजता श्री शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, कोथरूड, पुणे येथे हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांच्यासह समविचारी संघटनाही सहभागी झाल्या होत्या. 

यापूर्वीही आमिर खानच्या ’पीके’ चित्रपटात भगवान शिवाविषयी अपमानास्पद दृष्ये आणि आक्षेपार्ह संवाद दाखवले होते. हिंदु संतांना गुंड म्हणून दाखवले होते. आता तोच प्रकार ’महाराज’ या चित्रपटातून त्याचा मुलगा करत आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे म्हणणे आहे.

सुमारे दीडशे वर्षापूर्वी इंग्रजांच्या राजवटीतील एका घटनेवरून आज पुन्हा साधूसंत आणि वल्लभ संप्रदाय यांच्याविषयी चुकीचे चित्रण उभे केले करत या चित्रपटाच्या माध्यमातून देशभर साधूसंतांची आणि वल्लभ संप्रदायाची बदनामी करण्याचे षड्यंत्र केले जात आहे, असा समितीचा आरोप आहे.

या चित्रपटात साधू-संत हे दुराचारी आणि वासनांध असतात, असे दाखवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडली, तर त्याला सर्वस्वी जुनैद खान, यशराज फिल्म आणि नेटफ्लिक्स हे जबाबदार असतील, असे समितीने म्हटले आहे.

जुनैद खान, आमिर खान, यशराज फिल्म आणि नेटफ्लिक्स हे इतर धर्मातील चुकीच्या प्रकारांवर आधारित विषयांवर चित्रपट काढण्याचे धाडस करणार नाही; मात्र हिंदु संतांना, हिंदु धार्मिक कृत्यांना सहजतेने लक्ष्य केले जाते, असेही हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.

’सेक्युलरिझम’च्या नावाखाली केवळ हिंदूंच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवले जाते. हे कदापि सहन केले जाणार नाही. या चित्रपटाच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हिंदूंच्या सहनशीलतेचा सरकारने अंत पाहू नये, असेही म्हटले आहे.

सरकारने या चित्रपटावर तत्काळ बंदी घालावी. तसेच देवता, धर्म, संत आदींचा अवमान रोखण्यासाठी ’ईशनिंदा विरोधी कायदा’ देशभरात लागू करावा, अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी समितीच्या वतीने केली आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !