आज दि. २३जून. म्हणजेच आंतरराष्ट्रीय विधवा दिवस आहे. पतीचे निधन झाल्यानंतर त्यांना त्यांचे हक्क मिळावेत, सुरक्षितता लाभावी, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अजूनही कित्येक कुंटूबामध्ये पती निधनानंतर पत्नीचे हक्क डावलले जातात.
लूंम्बा फाउंडेशनने विधवांना मदत आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी हा दिवस सन २००५ पासून सुरू केला आहे. सन २०१० मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस अधिकृतपणे दि. २३ जून रोजी जाहीर केला. असो. विधवांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.
पण.. परवा एका वृत्तपत्रात बातमी आली होती, विधवांचा वटपौर्णिमेच्या दिवशी सन्मान करण्यात येणार. माझा मुळी या गोष्टीला आक्षेप आहे. त्यांना तुम्ही वेगळ्या आहात, दयनीय आहात याची जाणीव करून देताय का?
मुळातच एकटी राहणारी स्त्री कमजोर आणि लाचार आहे, हा समज खोडून काढणारी अनेक उदाहरणे देता येतील. आदिम काळापासून मुक्त मानवाचा प्रवास मातृवंशीय ते मातृसत्ताक पद्धती आणि नंतर पितृसत्ताक पद्धती, असा आहे.
म्हणजे मातृसत्ताक पद्धतीमध्ये ती योग्य रितीने आपल्या समाजाचे आणि संसाराचे संचलन करत होती हे निश्चित..! पुरुषसत्ताक पध्दतीने स्त्रीला ताब्यात ठेवणे जेव्हापासून चालू केले तिथंच सारं असमतोल झाले.
स्त्री हीच स्त्रीची खरी शत्रू ह्या भोंगळ व्याख्येवर पूर्ण विश्वास असणारा आपला बहुतांशी समाज आहे. 'मैत्री' ही भावना सहकार्य या मुल्यातून जन्म घेते, जो स्त्रीचा स्थायीभाव आहे.
पुरुषसत्ताक पद्धती चालू झाल्यानंतर विवाह प्रथा चालू झाली आणि स्त्रियांच्या नैसर्गिक भावनेचे सामाजिक दृष्ट्या आणि कौटुंबिक दृष्ट्या दोन तट पडत गेले. विवाहातून वैधव्य ही स्थिती उदयाला आली. स्त्रियांचे विवाहित, अविवाहित, घटस्फोटित, परित्यक्ता असे प्रकार निर्माण झाले. आणि ते स्त्रीचा सामाजिक स्तर मोजण्याचे परिमाण झाले.
मातृत्वाचेही तेच. औरस, अनौरस, बेवारस, असे संततीचे प्रकार निर्माण झाले. अशी वर्गवारी केल्याने मातृत्व विनाकारण कलंकित झाले. यावर मी सामाजिक उतरंड या लेखात बोलले आहेच. 'आजची स्त्री काही अंशी पुरुषहिताच्या संस्कारातून वाढली आहे.
पुरुषसत्ताक पध्दतीने गेल्या काही हजार वर्षात स्त्रीला अशा दिशेने आणले आहे, की दुसऱ्या स्त्रीशी शत्रूत्व केल्याशिवाय तिचे अस्तित्व सिद्ध होत नाही. जनावर जर वर्षानुवर्षे ऊसाच्या रानातच वाढले, तर त्याला ऊसाचे शेत हेच आपले निवासस्थान आहे असं वाटणार. त्यांना आपला निवासस्थान जंगल आहे, हे कसं कळेल.?
प्रसिद्ध लेखिका सिमॉन म्हणते, जगाच्या पाठीवर स्त्रिया कधीही 'फक्त आपल्या' हक्कासाठी लढल्या नाहीत.. स्त्रियांनी स्वतःचा धर्म किंवा राजकीय पक्ष स्थापन केला नाही. कारण पुरुषसत्ताक संस्कृतीत आनंद मानणाऱ्या स्त्रिया एका गावात, शेजारी, एका घरात राहूनही समकालीन नसतात.
ऊसालाच निवासस्थान समजणाऱ्या स्त्रीला वाटत राहतं की ही दुसरी स्त्री कशी मुक्त राहू शकते.! पत्नी वारल्यानंतर पुरुषाला समाज सहज सामावून घेतो, पण स्त्रीला मात्र दयनीय समजतो आणि करतो देखील.
विधवा, सवाष्ण, कुमारिका इत्यादी इत्यादी कॅटेगिरीतून तिला मुक्त करून, तिचं माणूस असणं मान्य करून, तिला माणूस म्हणून जगायला देणं, तिचा सन्मान करण्याची गरज इथे अधोरेखित झाली आहे.
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)