समोरचा माणूस जसा आहे तसा स्वीकारणे म्हणजेच 'सहिष्णुता'


मुळात सहिष्णुता म्हणजे काय.? देशात वेगवेगळे धर्म, जाती, पंथ आहेत.त्यांच्या श्रध्दा, स्वभाव, प्रथा इ. इ. वेगवेगळे असू शकतात. समोरचा माणूस रुपाने, वृत्तीने कसाही असला तरी त्याला तसे असण्याचा हक्क आहे. आणि तो निसर्गदत्त आहे, हे स्वीकारणे म्हणजे सहिष्णुता.

आपल्यापेक्षा त्याच्या आवडीनिवडी, विचार भिन्न असले तरी, आपल्याला न पटणारे असले तरी त्याचा अधिक्षेप न करता आपण त्याच्याशी असणारे मैत्र जाते ठेवतोच ना.? ही असते सहिष्णुता.!

रोज आपला कितीतरी लोकांशी संबंध येत असतो. तेव्हा कुणाकडेही पहाताना आपला दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित नसणे ही असते सहिष्णुता. आता तुम्ही म्हणाल की सहिष्णुता म्हणजे नेमके काय.?

समोरच्या आपल्यापासून वेगळ्या असलेल्या व्यक्तीला किंवा समुहाला त्यांच्या वेगळ्या असणाऱ्या मतांसह सकारात्मक रितीने स्विकारले जाणे, व्यक्तीला, समुहाला जातीने, धर्माने, खाण्यापिण्याच्या सवयीने, वर्तणुकीने वेगळे असण्याचा हक्क आम्ही चालवून घेतो, असं म्हणत असाल तर सहिष्णुता नाही.

माझ्यापेक्षा वेगळे असणे हा समोरच्याचा अधिकार मान्य करणे म्हणजे सहिष्णुता. कारण यात नैतिकता आहे. या नैतिक विचारात इतरांविषयीचा आदर, चांगुलपणा आणि न्याय्य दृष्टीकोन सामावला आहे.

जी माणसे संवेदनशील असतात ती इतरजनांचे विचार, भावना आणि अनुभव याबद्दल सहवेदना बाळगत असतात. याला सहवेदना बाळगण्याला सहिष्णुता म्हणतात.

दुसऱ्यांच्या मतांचा आदर करणे, त्याच्या जागी स्वतःला कल्पून, त्यांच्यासारख्या अनुभव स्वतःला आला तर आपण कसे वागू, असे प्रश्न ते स्वतःला विचारतात. असे करणे हे समाजाभिमुख आणि परहितदक्ष असण्याचे खरे लक्षण. तेच नेहमी सहिष्णुतावर्धक असते.

अर्थात म्हणून दुसऱ्यांचे अविवेकी, तारतम्यहीन विचार अथवा वर्तन सहन करावे असे नाही. कारण अविवेकी वर्तन आणि अविवेकी विचार नेहमीच असहिष्णुतेला जन्म देणारी असते.

आजच्या घडीला जातीय धार्मिक द्वेष, धर्मांधता, वांशिक वाद, बलात्कार या घटना समाजात असहिष्णुता वाढवणारे आहे. सतत चाललेले धार्मिक धुर्विकरण थांबून सहिष्णुता जपायला आणि जोपासायला हवी.

भारतीय संविधानात नमूद असणारी समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता ही मुल्य समाजात नव्याने रुजवायची वेळ आली आहे. माझा धर्म हिंदू धर्म आहे आणि तो मला सहिष्णुता शिकवतो. दुसऱ्या धर्माचा द्वेष कधीच शिकवत नाही, हे आपण आता स्वतःला सतत बजावत राहायला हवं...! बघा पटतंय का.?

- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !