जगभरातील ६० देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढू लागले. केवळ पुरुषांचे वर्चस्व असलेली अनेक क्षेत्रे बायकांनी काबीज केली आणि येथे स्त्री-पुरुषांच्या संघर्षाची बीजे रोवली गेली.
काही स्त्रिया ४९८ या कायद्याचा ढाल म्हणून उपयोग करत असल्याचे दिसले, दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोड नसलेला हा कायदा असल्यामुळे या कायद्याचा अनेक ठिकाणी गैरवापर होऊ लागला.
यासाठी पुरुषांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून त्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पुरुष दिनाचे राष्ट्रसंघ समाज समुदाय कुटुंब, विवाह, बाल संगोपन, या योगदान असावे, असे वाटते.
खरंतर प्रत्येक माणसात 'स्त्री' आणि 'पुरुष' दोन्ही असतात. पण मुलीत दडलेले 'पुरुषत्व' व मुलात दडलेलं 'स्त्रीत्व' समाज व्यक्त होऊ देत नाही. अर्थात हे माझे मत सर्वांनाच पटेल असं नाही.
पण पुरुषांनी जर स्त्रीला माणूस समजून घरातील भाजी कुठली करायची इथपासून मुलांचा अभ्यास कोणी घ्यायचा रात्रीच्या जेवणात काय हवं, या सगळ्या स्त्रियांसाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टीत पुरुषांचा सहभाग हवा.
म्हणजे होणारे मतभेद अलीकडे वाढलेले विवाह विच्छेद हे होणार नाहीत. आपल्या मुलांना 'पुरुष' म्हणून वाढवण्यापेक्षा 'माणूस' म्हणून वाढवणं आत्ता या घडीला गरजेचं आहे. अर्थात मुलींनीही कामाची समान विभागणी एकमेकांचा आदर स्वतःला जास्ती पगार असेल तर जोडीदारचा अनादर करू नये या गोष्टी पाळल्या पाहिजेत.
मी कधीतरी तुमच्यासाठी काहीतरी करतो हा दृष्टिकोन जगताना न ठेवता मी रोज एक वेळेचा स्वयंपाक करणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण मित्रांमध्ये बसून बायकांच्या स्वयंपाकाची बरेच जण टिंगल करतात.
खरंतर घरात काम करणारे स्वयंपाक करणारे, भांडी घासणारे पुरुष हे आपल्या हृदयी एक ममत्व घेऊन जन्माला आलेले असतात. बाई नोकरी करणारी असेल तर घरातील साहित्य संपला आहे, काय काय आणायचं आहे, हे सतत विचार करत असते. हा विचार नव्या पिढीतील पुरुषांनीही करायला हरकत नाही.
सतत बायकांवर पांचट जोक करणारे तिच्या शरीरावरून, स्वभावावरून, दिसण्यावरून, विनोद करून, टिंगल करणारे पुरुष कुठल्याही स्त्रीला आवडत नाहीत किंवा ते तिच्या आदरास प्राप्त होत नाहीत.
तिच्या ड्रायव्हिंग वरून होणारे जोक तर उद्वेग आणणारे असतात. मुख्य म्हणजे बायकाही या विनोदांना हास्य आणि टाळ्या देत असतात हे मोठं विचित्र वाटतं. आणि सत्य म्हणजे जगातील सर्वात जास्त ॲक्सिडेंट हे पुरुषांच्या हातून होतात.
या फालतू विनोदामुळे आपण अवघ्या स्त्री जातीचा अपमान करत असतो, हे त्या सोकॉल्ड विद्वानांच्या लक्षात येत नाही. यात स्वतःची आईसुद्धा येते. उलट घरातील वरिष्ठ स्त्री-पुरुषांनी आपल्या मुलांना किचन मॅनेजमेंटमध्ये उत्तम प्रगती करावी, यासाठी प्रोत्साहन द्या, त्यांचे कौतुक करा.
जावयाने मुलीला मदत केली तर 'जावई चांगला' आणि मुलाने बायकोला मदत केली, तर तो 'बायकोचा बैल', हा दुटप्पीपणा आता सोडूया. आपल्या मुलाचा आणि सुनेचा आणि मुलीचा आणि जावयाचा एकमेकाच्या साथीने चाललेला संसाराचा प्रयोग दुरून निवांत आनंदाने पहा.
त्यांनी हाक मारली तर जरूर 'ओ' म्हणा, नाहीतर अनावश्यक सल्ले देणे दोन्हीकडच्या आई-बाबांनी टाळावेत. पुरुषांच्या हृदयातील असणारे एक मवाळ मातृ हृदय त्याच्या लहानपणापासून जपायला हवे.
कधी मुलं रडली तर "तू काय बाई आहेस का रडायला?" असे अजिबात म्हणू नये. कारण भावनांचा निचरा करणे ही प्रत्येक माणसाची गरज आहे. या रडू न देणाऱ्या संस्कारामुळे मुले भावना आतल्या आत धुमसत ठेवतात आणि त्याचा उद्रेक कधी लहान बहीण, बायको, मुलगी, बाहेरची स्त्री यांच्यावर होतो.
आपल्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा किंवा एकहाती घर सांभाळण्याचा त्रागा, थकवा, त्यांच्या प्रगतीतील अडसर, दमछाक, दु:ख, मानसिक ताण, घरी मिळणारी सततची दुय्यम वागणूक ह्या सर्वांचा केंद्रबिंदू खरंतर स्वयंपाक घर आहे.
कारण तिची उर्जा तिथे जास्त खर्च होत असते. हे जर बरोबरीने केले गेले तर तिचं फ्रस्ट्रेशन संपून जाईल. मुलांनी किंवा मुलींनी त्यांच्या संसारातील अडचणी परस्परांशी बोलून संपवाव्यात. यात दोघांनीही पालकांची मदत घेऊ नये.
कितीतरी घरात मुलांना आई-वडील मत व्यक्त करू देत नाही. त्यामुळे ती मुले आतल्या आत घुसमटून हेकेखोर होतात आणि मग नंतर बायकोसमोर तोच रुबाब दाखवतात. त्यामुळे घरात सर्वांना आर्थिक व्यवहार माहिती असायला हवेत. एकमेकांचे प्रॉब्लेम्स, कर्ज, त्याचे हप्ते, याविषयी त्यांनी एकमेकांशी मोकळेपणाने बोलायला हवं.
माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे प्रेमसुत्र प्रत्येक घरात अंमलात आणायला हवं. म्हणजे एकमेकांची मने दूर जाऊन दोन्हीकडचे आईबाबा विनाकारण व्हिजन होणार नाहीत.
खऱ्या अर्थाने पुरुष होण्यापेक्षा माणूस म्हणून जगणाऱ्या, मैत्र जपणाऱ्या, सहचारिणीचा सन्मान करणाऱ्या माझ्या पुरुषमित्रांना 'पुरुष दिनाच्या.. अंह, 'माणूस दिना'च्या दिलसे शुभेच्छा. रथाची दोन्ही चाके समान आकाराची आणि एकाच ध्येयाकडे जाणारी असावीत. शुभास्ते पंथान संतु.
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)