येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
नाशिक : येथील पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल एक्सप्रेस इन च्या मागील बाजूस असलेल्या हॉटेल रेडीसन ब्लु जवळील खंडेरावनगर चौक हा अपघातांचा सापळा बनला आहे. याठिकाणी होणाऱ्या आपघातांची मालिका थांबविण्यासाठी व येथील रहीवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी या चौकात तत्काळ ‘स्पीड ब्रेकर्स’ बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
येथील ऑक्सीजन नर्सरी समोरील चौकात हॉटेल एक्सप्रेस इन कडून येणार रस्ता, पोतदार स्कूल कडून येणारा रस्ता आणि हरीविश्व कडून येणारा रस्ता असे तीन रस्ते एकत्र येतात. त्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक या चौकात असते. मोठी वाहने, कार, दुचाकी आशा वाहनांचा यात समावेश असतो.
भीतीच्या सावटाखाली रहिवाशी : तिन्ही रस्ते मोठे रस्ते असल्याने वाहने भरधाव वेगात चालतात. त्यांना कुठलाही अडसर नाही. यामुळे रोज छोटे-मोठे अपघात होतात. दुचाकीवरून जाणाऱ्या महिला, वृद्ध या आपघातांचे शिकार ठरत आहेत. अगदी भीतीच्या सावटाखालीच येथून प्रवास करावा लागतो.
काही दिवसांपूर्वी या चौकातील रवि रेंनीसन या सोसायटीसमोर दुचाकी आणि कारची जोरदार टक्कर झाली होती. असे जीवघेणे अपघात नित्याची बाब बनली आहे.
तत्काळ स्पीड ब्रेकर बसवा : अपघातांद्वारे नागरिकांचा कर्दनकाळ बनलेल्या ऑक्सीजन नर्सरी येथील खंडेरावनगर चौकातील तीनही रस्त्यांवर तत्काळ स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी रोज जीव मुठीत घेऊन येथून वावरणाऱ्या स्थानिक रहीवाश्यांकडून केली जात आहे.
सध्या सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे होणाऱ्या दुखापतीने ग्रस्त आणि भविष्यात येथील रहिवाशांच्या जिवावर बेतण्याची गंभीर परिस्थिति लक्षात घेता नाशिक महानगरपालिका व वाहतूक पोलिस शाखेने याची तत्काळ दखल घेऊन या भागात तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची गरज आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या अप्रिय घटना रोखता येतील.
धूम रायडर्सचा ‘रात्रीस खेळ’ थांबवा : या भागात रात्री-बेरात्री भरधाव वेगात धूम स्टाइलने दुचाकी स्वारांच्या नाइट रायडर्स टोळ्या धुमाकूळ घालत असतात. यामुळे देखील दिवसभर अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तसेच परिसरातील या काही टपोरींचा भर रात्रीत चालणारा बाइक रायडर्स चा हा खेळ येथील रहीवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या प्रकाराची दखल घेऊन पोलिसानी यांना आपला खाक्या दाखवून त्यांना वेळीच वेसण घालण्याची मागणी येथील रहीवाश्यांमधून होत आहे.