पण उशीरा का होईना शहाणपण आलं..!


प्रिय माय मराठी,
साष्टांग दंडवत.! माय अखेर तू अभिजात भाषेचा दर्जा मिळवलास. किती वर्ष वाट पहायला लागली पण उशीरा का होईना शहाणपण आलं..! मातृभाषा म्हणजे मायभाषा पहिले बोल तोंडी आले ते तुझे स्वर घेऊन, व्यंजने बनली वाक्याचे साधनं..

माय गं, तुला अभिजात भाषेचा दर्जा अस्साच नाही हो मिळाला. इ.स. 100 मध्ये गाथासप्तशती नांवाचा राजा सातवाहन हाल यांचा लोककवितांचा संग्रह आहे. या कविता गोदावरी नदी, पैठण, त्र्यंबकेश्वर गावाचे वर्णन करणाऱ्या आहेत. याच शतकात वाशिमच्या राजाने रावणहो हा ग्रंथ लिहिला. आणि माय तुला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पुरावे द्यायला लागले, असो.

तिसऱ्या शतकातील.. नाणेघाटावरील शिलालेख इ.स. 250 मध्ये गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजाने मराठी भाषेत कोरला आहे. तर श्रवणबेळगोळ येथे मराठी भाषेतील शिलालेख इ.स. 850 चा आहे. 'चांमुडाराये करवियले, गंगाराम सुत्ताले करवियले ' असा उल्लेख आहे. हा उल्लेख बाहुबलीच्या मूर्तीच्या खाली आहे. म्हणजे तुझा वावर, पहिल्या ,तिसऱ्या, सातव्या, आठव्या, नवव्या शतकात आढळतो.

पैठण सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री तथा मराठी म्हणजे तुझा वापर त्यांच्या प्रशासनात केला. खरी भरभराट देवगिरी यादव कुळात तुझी आणि मराठी संस्कृतीची झाली. माय, तुझा धर्मोपदेशमाला इ.स. 859 या पुरातन ग्रंथात उल्लेख आहे. या धर्मोपदेशमाला पुस्तकात तुझे वर्णन करताना म्हटले आहे, 

सल्लयी...परी...संचारा....
पयडियमाणा, मरहठ्ठ
भासा सुंदर कामिनी
या अडवीय..!
अर्थात - मराठी भाषा सुंदर कामिनी प्रमाणे असून सुंदर गतीची, मदनाने भरलेली असून चांगल्या वर्णाची आहे.
माय, तुझा उगम कुठल्याही कुठल्याही भाषेपासून नाही, असं म्हणतात खरंच असावं ते... स्वयंभू आहेस तू...!
तरीही लोक इंग्रजाळलेले मराठी बोलत रहातील. तू आपल्या पोटात शांतपणे अनेक शब्दांना सामावून घेशील.
राग नाही पण खंत जरुर वाटते.. असो.

तुझा अभिमान वाटला म्हणूनच तुझ्या पुनरोध्दारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रघुनाथराव हणमंते, धुंडीराज व्यास या विद्वानांकडून ‘राज्यव्यवहार कोष’ हा महत्वपूर्ण मराठीभाषाकोश तयार करून घेतला. आता माय तु अभिजात भाषा झालीस.. आता संशोधन होईल, तुझ्या उच्च साहित्यिक साहित्य संग्रहित होईल, प्राचीन ग्रंथ अनुवादित होतील.

माय तुझ्या मराठी उत्कर्षाचे काम करणाऱ्या संस्था, विद्यार्थी, व्यक्ती यांना भरघोस मदत मिळू शकेल. आता माय, तू अभिजात भाषा झालीस. ही मराठी सारस्वताची पालखी आता जोमाने पुढे जाईल. याशिवाय तुझ्या या लेकीला काय हवंय.? माय, तुझ्या या लेकीचे आणि सखीसंपदेच्या मुलींचे स्वप्न पुरे झाले आहे.

माय. तुझी लेक,
– स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !