सावधान ! वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी, चोरट्यांच्या मारहाणीत दाम्पत्य जखमी


समीर दाणी (अहिल्यानगर) - नेवासा तालुक्यातील वांजोळी गावातील मोरे चिंचोरे रोडवरील दाणी वस्ती येथे रविवारी ( दि.१६) मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी पती पत्नीस धारदार शस्त्राने जबर मारहाण करीत एक लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

या घटनेत पती-पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि अधिकारी, सोनई पोलिसांचे पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

शांताराम विठ्ठल दाणी (वय ५५) हे आपल्या पत्नीसह घराच्या पडवीत झोपले होते. यावेळी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांना पडवीतील पलंगावर झोपलेल्या पत्नीचा ओरडण्याचा आवाज आला. ते उठले असता त्यांना चौघेजण आपल्या आजूबाजूला उभे असल्याचे दिसले.

यावेळी चौघांनी त्यांना तलवार आणि चाकूने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये शांताराम दाणी यांच्या डोक्यावर वार करण्यात आले. तर त्यांच्या पत्नीला उजव्या हाताला चाकूचा वार करत अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून घेतले.

त्यानंतर दोघे चोर घरात घुसले त्यांनी शांताराम दाणी यांच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावत घरातील महिलेचे गळ्यातील अर्धा तोळा व कानातील सोन्याचे दागिने आणि मुलाकडील मोबाईल व गळ्यातील सोन्याचा ओम, असा जवळपास एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

तसेच जीवे मारण्याची धमकी देत तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पहाटे सोनई पोलिस ठाण्याचे सपोनि विजय माळी, पीएसआय मुंढे आपल्या पथकासह गावात दाखल झाले.

यावेळी श्वानपथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. रविवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करत पथके तपासाच्या दृष्टीने रवाना केली.

यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक कलबुर्गे, पोलिस उपाधीक्षक सुनील पाटील यांनीही घटनास्थळी पाहणी करत तपास पथकास सुचना दिल्या. वांजोळीत यापुर्वीही वारंवार असे प्रकार घडत आहेत. कालच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिस प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच या घटनेतील आरोपींचा तातडीने तपास करावा, अशी मागणी चेअरमन बद्रीनाथ खंडागळे, सरपंच अप्पासाहेब खंडागळे, उपसरपंच मंगेश पागिरे, आदिनाथ काळे, राजेंद्र दाणी यांनी केली.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !