येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट कार्यासाठीचा ‘युवा गौरव पुरस्कार’ संदीप कुसळकर यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र आणि रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
दि. १० फेब्रुवारी रोजी विद्यापीठाचा ७६ व्या वर्धापन दिन साजरा झाला. यानिमित सामाजिक कार्य क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विद्यापीठाचा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार कुलगुरू डॉ सुनील गोसावी आणि डॉ शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
संदिप कुसळकर यांच्यासोबत ऑलंपिक पदक विजेता स्वप्निल कुसळे यास क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल आणि शुभंकर एकबोटे यांस कला क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सुमेध इंगळे यांनाही युवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
युवान संस्थेच्या माध्यमातून संदीप कुसळकर यांनी अनाथ, आदिवासी, भटके विमुक्त आणि ग्रामीण भागातील अत्यंत गरजु तरुण विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृहासोबत हक्काचे कुटूंब मिळवून दिले आहे. शेकडो अनाथ बालकांना आनंददायी उपक्रमांच्या माध्यमातून मानसिक आधार मिळवून दिला आहे.
विविध सामाजिक चळवळीच्या माध्यमातून वेळप्रसंगी संघर्ष करून महिला आणि बालके यांना न्यायही मिळवून दिला आहे. प्रेरणा उपक्रमाच्या माध्यमातून हजारो तरुण मोफत स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शनासाठी युवान संस्था कार्याशी जोडले गेले आहेत.
अहिल्यानगर शहरात तीन वेळा राष्ट्रीय स्तरावरील युवा एकात्मता शिबिराच्या आयोजनातून १२०० पेक्षा अधिक समर्पीत युवा स्वयंसेवकांचे जाळे त्यांनी देशभर तयार केले आहे. या माध्यमातून नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्ती काळात हे प्रशिक्षित स्वयंसेवक तत्काळ सक्रीय मदत कार्य राबवितात.
विशेषतः देशभरातील विविध ठिकाणी आलेल्या महापूर आणि कोविड आपत्ती काळात संदीप कुसळकर यांनी विशेष मदत कार्य राबविले आहे. ज्याचा हजारो आपत्तीग्रस्तांना फायदा झाला. केंद्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सनेही त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना समितीत स्थान दिले होते.
विद्यापीठाच्या ‘युवा गौरव पुरस्काराबद्दल’ पद्मश्री पोपटराव पवार, डॉ. प्रकाश आमटे, राष्ट्रीय युवा योजनेचे रन सिंग परमार, करियाल सुकुमारन, मधुसूदन दास, नरेंद्र वडगावकर, आय लव नगरचे नरेंद्र फिरोदिया, घर घर लंगरचे हरजितसिंह वधवा, सुवालाल शिंगवी, सुरेश मैड, प्रा. प्राजक्ता भंडारी, गीतांजली भावे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.