अहिल्यानगर - श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बुऱ्हाणनगर, अहिल्यानगर येथे सांस्कृतिक विभागांतर्गत वार्षिक पारितोषिक वितरण करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. डी.आर. ठुबे (न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,पारनेर) यांच्या हस्ते वार्षिक पारितोषिके वितरित करण्यात आली. हर्षल हरिभाऊ होले (एफवाय बीकॉम सीएचा) याची अखिल भारतीय अंतर विद्यापीठ रायफल शूटिंग स्पर्धेत पंजाब येथे निवड झाली आहे.
विजय फुलमाळी (एसवाय बीसीएस) याला नॅशनल गेम्समध्ये ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळाले. श्रावणी बारवकर (एसवाय बीकॉम) हिची महाराष्ट्र राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अनोश पाचारणे (एसवाय बीसीएस) याची महाराष्ट्र राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. भारत होळकर (टीवाय बीए) याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
हर्षदा घाडगे आणि अभिषेक घाडगे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून महाविद्यालयाचे नाव उंचावत असतात.
प्रमुख पाहुणे डॉ. डी. आर. ठुबे सरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन, डीआरडीओ, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि विज्ञान क्षेत्रात संशोधन करण्यास विविध क्षेत्रात संधी उपलब्ध यावर मार्गदर्शन केले.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये संस्कृती विभाग अंतर्गत चेस, कॅरम, लिंबू चमचा, पासिंग बॉल, फूड स्टॉल, आणि सांस्कृतिक नृत्य, नाटक, वादन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक विभागांतर्गत सर्टिफिकेट व भेटवस्तू देण्यात आली. याप्रसंगी श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व संचालक युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अध्यक्ष म्हणून लाभलेले आणि वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रोत्साहित करणारे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय जाधव, आयक्यूएसी कॉर्डिनेटर डॉ. आर. एच. शेख, कला शाखाप्रमुख व परीक्षाधिकारी डॉ. बी. एम. मुळे, उपस्थित होते.
तसेच यावेळी सांस्कृतिक समन्वयक डॉ. राणी केदार, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. स्वाती वाघ, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. धनश्री दिवटे, आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभागातील सदस्यांनी विशेष कष्ट घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा पुंडे यांनी केले. आणि प्रा. इप्तीसाम पठाण यांनी आभार मानले.