अहिल्यानगर - समाजातील वंचित, शोषित घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) महत्वाची पावले उचलली आहेत. जिल्हाध्यक्ष योगेश रघुनाथ साठे यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल असलेल्या किंवा अद्याप न्याय न मिळालेल्या प्रकरणांची सविस्तर माहिती वंचित बहुजन आघाडीला पाठवावी.
या आवाहनात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधित गुन्ह्याचा एफआयआर, क्रॉस तक्रारी असल्यास दोन्ही एफआयआर, जखमी असल्यास मेडिकल सर्टिफिकेट, न्यायालयीन आदेश असल्यास त्याची प्रत आणि प्रकरणाची वस्तुस्थिती ७७७४९७०९८७ या मोबाईल क्रमांकावर पाठवावी.
ज्या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाला असला तरी कार्यवाही होत नाही, पोलिस दाद देत नाहीत किंवा राजकीय दबाव टाकला जात आहे, अशा सर्व प्रकरणांचीही माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या लीगल सेलमार्फत अशा सर्व ॲट्रॉसिटी प्रकरणांमध्ये योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे.
ॲट्रॉसिटी कायदा अधिक प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज असून, हा लढा बळकट करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.