नागपूर - मराठी भाषेत गाजलेल्या 'गार्गी' या चित्रपटाचे दिग्दर्शक आशीष उबाळे (वय ६०) यांनी आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी नागपुरातील रामकृष्ण मठात घडली आहे.
याबाबत, धंतोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशीष हे मूळचे नागपूरचे होते. ते प्रतापनगर येथे वडिलोपार्जित घरात राहत होते. २५ वर्षांपूर्वी त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात काम सुरू केले. त्यासाठी त्यांनी मुंबई गाठली होती.
त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी काही वर्षांपूर्वी प्रतापनगरातील घर विकले होते. त्यानंतर आई-वडिलांसह ते मुंबईत राहायला गेले. त्यांनी काही मालिकांचे दिग्दर्शन केले होते. त्यासाठी कर्ज घेतले. परंतु, अपेक्षित यश न मिळाले नाही.
त्यांच्यावरील कर्जाची रक्कम वाढत गेली.
दोन दिवसांपूर्वी ते मुंबईहून नागपुरात आले होते. धंतोलीतील रामकृष्ण मठात त्यांचा लहान भाऊ सारंग उबाळे याला भेटण्यासाठी ते रामकृष्ण मठात गेले होते.
शनिवारी सायंकाळी मठात चहा घेण्यासाठी ते बाहेर न आल्याने सारंग त्यांच्या खोलीत गेला. त्यावेळी त्याला आशिष हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.