राहुरी (अहिल्यानगर) – शहरातील स्टेट बँक शाखेसमोर मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेले एक लाख रुपये चोरल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी आंतरराज्य गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश केला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून साठ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
दि. २८ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी सोमनाथ लक्ष्मण ढसाळ यांची मोटारसायकल स्टेट बँक शाखेसमोर उभी असताना डिक्कीत ठेवलेले एक लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते.
याप्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आंध्रप्रदेशातील आरोपी निष्पन्न केले.
पितला देवाधनम नागय्याह (वय 35), अवुला आमोसे थिप्पाइह (वय 37) व कुणचाला चिन्ना रवी (वय 37), अशी त्यांची नावे आहेत. या सराईत आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथे पकडले.
चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना 5 जून रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी आतापर्यंत चोरलेले ६० हजार रुपये जप्त केले असून उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे. या टोळीने इतर ठिकाणीही गुन्हे केल्याचा संशय असून तपास अधिकच खोलात जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये पोलिस निरिक्षक संजय ठेंगे, सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे, विजय नवले व पोलिस कॉन्स्टेबल जयदीप बडे, योगेश आव्हाड यांच्या पथकाने केली.